मुलांनो, पावसाळा सुरू झाला की आपण सगळ्यात आधी कोणती वस्तू शोधतो? अर्थातच – छत्री (umbrella)! भिजण्यापासून वाचवणारा हा सर्वात सोपा आणि विश्वासू उपाय आहे. शतकानुशतके जगभरात याचा वापर होत आला आहे आणि आजही प्रत्येक पावसाळ्यात ती आपली खास मैत्रीण ठरते. छत्र्यांचे आकार, रंग, डिझाईन्स आणि प्रकार इतके वेगवेगळे असतात की त्यांची मोजदाद करणे कठीण.
पण तुम्हाला माहीत आहे का, जगातील काही देशांत तर छत्र्यांचे खास संग्रहालयेही आहेत! येथे लोकांना छत्रीचा इतिहास, तिचा प्रवास आणि वेगवेगळ्या प्रकारांचा जवळून अनुभव घेता येतो. चला तर मग, आज आपण अशाच काही अनोख्या संग्रहालयांच्या सफरीला जाऊया.
अंब्रेला (umbrella) अँड पॅरासोल म्युझियम – इटली
इटलीतील पीडमॉंट भागात वसलेले हे अनोखे छत्री व पॅरासोल संग्रहालय पाहण्यासारखेच आहे. १९३९ साली इगिनो अँब्रोसिनी नावाच्या व्यक्तीने याची स्थापना केली. ते व्यवसायाने कृषी तज्ज्ञ असले तरी त्यांचा पिढीजात व्यवसाय छत्री बनवण्याचा होता, म्हणूनच छत्री त्यांना मनापासून आवडत होती.
१९७६ मध्ये हे संग्रहालय वर्बानो–कुसियो–ओसोला प्रांतातील गिग्नेस येथे असलेल्या दोन मजली इमारतीत हलवण्यात आले. येथे तब्बल १,००० हून अधिक छत्र्या, पॅरासोल आणि त्यांचे बनवण्याचे साहित्य प्रदर्शित आहे. १८०० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत छत्र्यांचा क्रमिक विकास येथे पाहता येतो.
रेशीम, लेस, सूत, कृत्रिम कापड, लाकूड, हाडे, धातूचे फ्रेम, लाकडावर नक्षीकाम केलेले हँडल, हत्तीच्या दातांपासून, मोत्यांपासून किंवा चांदीपासून बनवलेल्या छत्र्या येथे पाहून डोळे दिपून जातात. पहिला मजला छत्रीकारांच्या व्यवसायाला समर्पित आहे, तर येथे असलेल्या दोन प्रचंड छत्र्यांवर कलाकार फेलिस वेलन यांनी छत्री बनवणाऱ्या लोकांचे जीवनचित्र रेखाटले आहे. एवढेच नव्हे तर, माजी राणी मार्गरिटाची ऐतिहासिक छत्रीही येथे जतन केली आहे.
अंब्रेला (umbrella) कव्हर म्युझियम – अमेरिका
अमेरिकेतील पीक्स आयलंडवर वसलेले हे संग्रहालय अगदी वेगळेच आहे – कारण येथे छत्री नव्हे, तर छत्रीची कव्हरे जतन केली आहेत! १९९६ मध्ये नॅन्सी हॉफमन यांनी याची स्थापना केली. एके दिवशी कपाट साफ करताना त्यांना सात जुनी छत्री कव्हरे सापडली, आणि तेथूनच या संग्रहालयाची गोष्ट सुरू झाली.
सुरुवात त्यांच्या स्वयंपाकघरातून झाली. पण जसजसे संग्रह वाढत गेले, तसे हे एका मोठ्या ठिकाणी हलवण्यात आले. आज येथे ६६ देशांतून गोळा केलेल्या शेकडो छत्र्या आणि कव्हरे आहेत. दोन-दीड इंचाच्या बार्बी बाहुलीची छोटीशी छत्रीपासून ते सहा फूट लांबीच्या भल्या मोठ्या छत्रीपर्यंत सर्व काही येथे आहे.
७ जुलै २०१२ रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने हॉफमन यांचा ७३० छत्री (umbrella) कव्हर्सचा संग्रह हा जगातील सर्वात मोठा असल्याचे घोषित केले. आणि हो, येथे कधी कधी हॉफमन स्वतः ‘लेट अ स्माइल बी युअर अंब्रेला’ हे गाणे गात अॅकॉर्डियन वाजवत पर्यटकांचे मनोरंजनही करतात.
चीन छत्री (umbrella) संग्रहालय – चीन
चीनमधील हांगझोऊ हे दमट हवामान असलेले शहर आहे, आणि येथे पावसाचे प्रमाणही भरपूर आहे. म्हणूनच हांगझोऊला चीनी छत्रीचे जन्मस्थान म्हटले जाते. चीनचे हे पहिले छत्री संग्रहालय आहे, जे छत्री संस्कृती, इतिहास, कथा आणि निर्मिती प्रक्रिया यांचे सुंदर प्रदर्शन करते.
संग्रहालयाची रचना इतकी अप्रतिम आहे की आत पाऊल टाकल्यावर जणू तुम्ही पावसात उभे आहात, असे वाटते. मल्टिमीडिया साधनांनी तयार केलेले पावसाचे दृश्य, धुक्यासारखा पाण्याचा वाफाळ धूर आणि टाईल ग्रे रंगाच्या भिंती यामुळे वातावरण अधिकच खरेखुरे भासते.
येथे छत्री (umbrella) ची उत्पत्ती, तिच्या विविध श्रेणी, कला आणि आधुनिक नमुने अशा सहा विभागांत प्रदर्शन आहे. तसेच एक ‘इंटरॅक्टिव्ह झोन’ आहे, जिथे पर्यटक स्वतः छत्रीचे भाग जोडणे, रंगवणे आणि दुरुस्ती करणे याचा अनुभव घेऊ शकतात.
देशात उभारत असलेला रेन म्युझियम
आपल्या भारतात अजून छत्री (umbrella) संग्रहालय नाही, पण लवकरच एक अनोखे रेन म्युझियम तयार होणार आहे – तेही जगातील सर्वात पावसाळी ठिकाणी, मेघालयातील मॉसिनराम येथे!
मॉसिनराम येथे दरवर्षी ११,००० मिमीहून अधिक पाऊस पडतो. तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करून बांधले जाणारे हे पहिले वर्षा संग्रहालय पर्यटकांना पावसाचा इतिहास आणि महत्त्व सांगेल.
येथील खास आकर्षण असेल – ‘इनडोअर रेन झोन’, जिथे तुम्हाला आत असूनही पावसाचा अनुभव मिळेल. हवामान खात्याचे (IMD) आणि इस्रोचे प्रत्यक्ष वेळेतील डेटा वापरून पावसाचे मोजमाप कसे केले जाते, तसेच हवामान बदलाशी त्याचा काय संबंध आहे, हे समजावणाऱ्या इंटरॅक्टिव्ह प्रदर्शनांचीही येथे सोय असेल.
मुलांनो, पाहिलंत ना! साधी वाटणारी छत्री (umbrella) आणि पाऊस यांच्याशी किती अद्भुत कथा जोडलेल्या आहेत. आता पुढच्या वेळी पावसात छत्री धराल, तेव्हा तिच्या या अद्भुत प्रवासाची आठवण जरूर काढा.