Amazing: छोंजिन अंगमो : मनाच्या डोळ्यांनी एव्हरेस्ट सर करणारी पहिली दृष्टिहीन महिला

सारांश: छोंजिन अंगमो ही हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील दृष्टिहीन तरुणी आहे, जिने १९ मे २०२५ रोजी माउंट एव्हरेस्ट सर करत इतिहास घडवला. लहानपणी दृष्टी गेल्यावरही तिने हार न मानता शिक्षण, खेळ व पर्वतारोहणात यश मिळवले. तिच्या आत्मविश्वासाने आणि जिद्दीने ती जगातील पहिली दृष्टिहीन महिला म्हणून एव्हरेस्टवर पोहोचली. छोंजिनचे जीवन हे अपराजेय मनोबलाचे ज्वलंत उदाहरण आहे.

छोंजिन अंगमो ही हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील दृष्टिहीन तरुणी

दृष्टी नसेल तर जगणे अंधारमय होते, असे आपण सहज समजतो. पण ज्या व्यक्तीने स्वतःच अंधाराला प्रकाशाची दिशा दिली, ती म्हणजे छोंजिन अंगमो. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या, हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्याच्या चांगो या दुर्गम गावात जन्मलेली ही तरुणी, १९ मे २०२५ रोजी माउंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी उभी राहिली आणि सकाळी ८:३४ वाजता जगातील सर्वोच्च शिखरावर स्वबळाने पाऊल ठेवत जगातील पहिली दृष्टिहीन महिला म्हणून इतिहास घडवून गेली.

छोंजिनचे आयुष्य म्हणजे जिद्द, संघर्ष आणि अढळ ध्येयाने व्यापलेली एक यशोगाथा आहे. तिच्या आठव्या वर्षी एक औषध चुकीचे दिल्यामुळे तिची दृष्टी गेली. जिच्या डोळ्यांतून रंगीन जग पाहायचे होते, तिथे काळोख पसरला. पण हे अंधाराचे सावट तिच्या मनोबलावर पडू शकले नाही. डोळ्यांतला प्रकाश गेला, पण तिच्या मनातला सूर्य अजूनही तेजाने प्रज्वलित होता.

हेदेखील वाचा: दौलताबाद किल्ला : इतिहासाचा भक्कम अभिमान; 12 व्या शतकात यादव राजवंशातील भिल्लम पाचवा या पराक्रमी राजाने उभारला किल्ला

आई-वडिलांनी तिला लेहमधील महाबोधी शाळा व दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात दाखल केले. तिथेच तिच्या आत्मविश्वासाची, ज्ञानाची आणि कर्तृत्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या मुलीने केवळ दुःखाचे गारूड झुगारले नाही, तर राष्ट्रीय पातळीवरील पैरा-ॲथलीट म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले. माउंट कनामो सारखी कठीण शिखरे सर करताना तिच्या पावलांमध्ये गती होती आणि मनात निर्धार.

छोंजिनने तिचे शिक्षण चंदीगढ आणि नंतर दिल्लीच्या मिरांडा हाऊस महाविद्यालयात पूर्ण केले. शिक्षणासोबतच तिने लडाखमधील अनेक शिखरांवर चढाई करत आपली पर्वतारोहणाची तयारी पूर्ण केली. २०२१ मध्ये ती सियाचीन ग्लेशियरवर ‘ऑपरेशन ब्लू फ्रीडम’ या दिव्यांगांसाठी आयोजित मोहिमेत सहभागी झाली. तिच्या या जिद्दीचा आणि आत्मतेजाचा साक्षात्कार तिथेही झाला.

माउंट एव्हरेस्ट हे केवळ पर्वत नव्हे, ते लाखो स्वप्नांचे प्रतीक आहे. आणि छोंजिनने हे स्वप्न फक्त पाहिले नाही, तर त्याला आकार दिला. पायनियर एव्हरेस्ट एक्सपीडिशन अंतर्गत तिच्यासोबत मार्गदर्शक म्हणून डांडू शेर्पा आणि ओम गुरुंग होते. या शिखराकडे पाहताना बहुतेकांचे डोळे दिपतात; पण छोंजिनने डोळ्यांशिवायच त्यावर विश्वासाने चढाई केली. ती म्हणते, “मी माउंट एव्हरेस्ट डोळ्यांनी नाही, मनाने पाहिले आणि सर केले.”

सध्या ती युनियन बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहे. या बँकेने तिच्या मोहिमेसाठी आर्थिक व नैतिक पाठबळ दिले. तिच्या धैर्याला भारत सरकारने आणि विविध संस्थांनी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. पण तिचा खरा सन्मान हा समाजाने तिच्या प्रेरणादायी जीवनकहाणीला दिलेले मन:पूर्वक नमन आहे.
छोंजिनचे जीवन हे एक संदेश आहे—दृष्टी नसली तरी दृष्टीकोन हवा; अंधार असला तरी आंतरिक प्रकाश असावा; अडथळे असले तरी मनात हिमालयाएवढा आत्मविश्वास हवा. तिने सिद्ध केले की, एखाद्याचे शरीर असामर्थ्यवान असले तरी त्याचे मन आणि संकल्प हे अपराजेय असू शकते.

तिच्या जीवनाचा प्रत्येक क्षण सांगतो—“दृष्टी हरवली तरी काही हरवत नाही, जर तुमच्याकडे स्वप्नांना भिडण्याची हिंमत आणि आत्मविश्वास असेल!” छोंजिन अंगमो हे नाव आज फक्त एव्हरेस्टच्या उंचीवर नव्हे, तर जगभरातील लाखो मनांमध्ये उमटलेले एक प्रकाशपुंज ठरले आहे — अंधारावर विजय मिळवून उभारलेला एक सजीव दीपस्तंभ!

मुलांनो, छोंजिनचे जीवन आणि तिच्या संघर्षाची कहाणी वाचताना आपणही आयुष्यातील अपयशांसमोर कसे उभे राहावे, याचे प्रेरणादायी धडे मिळतात. अशा व्यक्तींकडून शिकायला हवे.”
-मच्छिन्द्र ऐनापुरे,जत जि.सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *