सारांश: माझे बाबा साधे, कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत. त्यांनी नोकरी करत शिक्षण घेतले आणि स्वतःच्या मेहनतीने रिक्षा व्यवसाय उभा केला. कुटुंबासाठी वेळ देणे, आमचा अभ्यास घेणे आणि वाचन करणे यांचा ते नेहमीच आग्रह धरतात. त्यांचे साधे आणि शिस्तबद्ध जीवन मला नेहमीच प्रेरणा देते.
माझे बाबा मला खूप आवडतात. त्यांचा मी लाडका मुलगा आहे. ते आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत. माझे बाबा हे पदवीधर असून नोकरी करत करत त्यांनी शिक्षण घेतले आहे. स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणारे बाबा मला नेहमीच प्रेरणा देतात. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे त्यांनी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय निवडला. सुरुवातीला दुसऱ्याची रिक्षा चालवत होते, पण कष्ट आणि बचतीच्या जोरावर त्यांनी स्वतःची रिक्षा घेतली.
बाबा सकाळी लवकर उठतात. दिवसाची सुरुवात ते देवपूजेनं करतात. साध्या जीवनशैलीत राहून ते आनंदी असतात. सकाळी आठ वाजता ते कामावर जातात. दिवसभर रिक्षा चालवून ते दुपारी घरी येतात, जेवण करून थोडा वेळ विश्रांती घेतात आणि पुन्हा कामावर जातात. रात्री आठ वाजता ते घरी येतात. घरी आल्यावर कुटुंबीयांसाठी वेळ काढणे हा त्यांचा नियम आहे. ते आमचा अभ्यास घेतात, आम्हाला छान छान गोष्टी सांगतात आणि कधी कधी प्रवाशांच्या गमतीजमतीही सांगतात.
हे देखील वाचा: स्ट्रॉ क्राफ्ट तयार करण्याची सविस्तर कृती 2 / Detailed recipe for making straw craft
बाबांना वाचनाचीही आवड आहे. एखादे चांगले पुस्तक मिळाले तर ते मन लावून वाचतात. त्यांना मुंबईतील अनेक ठिकाणे माहीत आहेत, त्यामुळे ते आम्हाला कधी कधी फिरायलाही नेतात. बाबांचे त्यांच्या रिक्षावर खूप प्रेम आहे. ती स्वच्छ ठेवणे, वेळोवेळी दुरुस्ती करणे ही कामे ते स्वतःच करतात.
आमच्या बाबांना कोणतेही वाईट व्यसन नाही. त्यांचे साधे, कष्टाळू आणि प्रामाणिक जीवन पाहून मला नेहमीच अभिमान वाटतो. ते आम्हाला शिकवतात की कष्ट, प्रामाणिकपणा आणि संयम हे यशाचे खरे मार्ग आहेत. माझे बाबा हे माझ्या आयुष्याचे आदर्श आहेत.