कथेचा थोडक्यात परिचय:ही कथा पावसाच्या थेंबांची, फुलांची आणि निसर्गाच्या नियमांची आहे. सूर्याच्या प्रखर उन्हामुळे तहानलेल्या धरतीवर काही थेंब खेळायला येतात. फुलं त्यांना पाहून आनंदित होतात, पण लोभ आणि चुकीच्या सल्ल्यामुळे बागेत खूप थेंब येतात आणि पूरसदृश स्थिती निर्माण होते. फुलं, झाडं आणि पानं यांना मग उमगते की निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ आणि प्रमाण असते. शेवटी ते वर्षाराणीच्या निर्णयावर विश्वास ठेवायला शिकतात.
🌧️ आकाशात सूर्य प्रखर तळपत होता. पृथ्वी पाण्याची आस लावून तहानलेली होती. वाऱ्याच्या झोतांबरोबर धूळ-माती फिरत होती आणि सगळीकडे धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. आकाशात मात्र पावसाचे नन्हे थेंब बरेच दिवस ढगांच्या घरात कैद झाले होते. उन्हाची तीव्रता त्यांना सहन होत नव्हती. म्हणूनच त्यांच्या आईने – वर्षाराणीने – आपल्या लेकरांना आणि ढग राज्यातील इतर थेंबांना घराबाहेर पडू नये अशी सक्त ताकीद दिली होती.
एका सकाळी वर्षाराणीने पाहिलं – सूर्य मुळीच चमकत नाही. तिने आनंदाने थेंबांना सांगितलं –
“आज तुम्ही थोडा वेळ जमिनीवर जाऊन खेळू शकता. पण लक्षात ठेवा – सगळे एकदम जाऊ नका. आणि मित्रांना सोबत नेऊ नका. कारण लाखो-कोट्यवधी थेंब एकदम पृथ्वीवर गेले, तर पूर येईल, समुद्र खवळेल, नद्या-नाले भरून जातील आणि शेतीचं नुकसान होईल.”

थेंबांनी वचन दिलं – “फक्त थोडेच थेंब खाली जाऊ.”
आईने दार उघडले. थेंब ‘टप-टप’ करत कोरड्या, तापलेल्या धरतीवर उतरले.
त्यांना पाहून बागेचा आनंद गगनात मावेनासा झाला. कोमेजलेली फुलं डोकी वर काढून हसली आणि म्हणाली –
“काय रे, आम्हाला विसरलात का? तुमच्याशिवाय किती हाल झालेत. आम्ही तहानेनं तडफडतोय.”
“नाही रे, आम्ही तुम्हाला विसरलो नाही,” ‘राया’ नावाच्या एका थेंबाने सांगितलं. “फार उष्णता होती म्हणून आई आम्हाला घराबाहेर येऊ देत नव्हती. आजही आम्ही थोड्याच वेळासाठी आलो आहोत. बाकी हजारो थेंब खेळायला उत्सुक आहेत.”
थोडा वेळ ‘टप-टप’ करत मस्ती करून थेंब म्हणाले –
“आता आम्ही परततो, आणि इतर थेंबांना पाठवतो. तेही कित्येक दिवस ढगांच्या घराबाहेर पडलेले नाहीत.”
हे ऐकून फुलं उदास झाली. धूळ-मातीने झाकलेली, तहानेनं कोमेजलेली फुलं म्हणाली –
“आता जर हे गेले आणि दुसरे थेंब आलेच नाहीत तर काय?”
गुलाब हळहळून म्हणाला – “माझ्या पाकळ्या उमलायला आतुर झाल्यात.”
तेव्हा झेंडू म्हणाला – “जर सुकुमार वारा मदत करेल, तर आपण हे थेंब थांबवू शकतो. तो त्यांना इथेच विखरून टाकेल.”
“पण तो आपल्याला अडचणीतही टाकू शकतो,” लिलीने समजावलं. “आपण वर्षाराणीवर विश्वास ठेवायला हवा.”
पण लिलीचं बोलणं कुणी ऐकलंच नाही. सगळ्यांनी मिळून गुलमोहराला वाऱ्याला बोलावायला सांगितलं.
सुकुमार वारा कपटीपणे हसला – “आज या थेंबांची गंमतच करतो.” तो मनाशी म्हणाला.
तो धावतच ढगांच्या घराकडे गेला. पण वर्षाला त्याचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून हळुवार वाहू लागला.
फार चपखलपणे तो घरात शिरला आणि थेंबांना फसवत म्हणाला –
“चला खाली. तुमचे मित्र तर पृथ्वीवर मजा करतायत. त्यांनी तुम्हाला विसरून टाकलंय. ते आता पार्ट येणार नाहीत आणि तुम्ही मात्र घरात कैद राहाल.”
थेंब आईची चेतावणी विसरून बाहेर पडले आणि भरधाव पृथ्वीवर पोहोचले.

‘टप-टप!… ‘टप-टप!…
सुरुवातीला फुलं आनंदली. पानं स्वच्छ झाली, फुलं उमलली. पण लगेच थेंबांची संख्या एवढी वाढली की फुलं गळून पडली. लवकरच बागेत पाणी साचलं.
गुलमोहर दुःखी स्वरात म्हणाला –
“देवा! मला माहीत नव्हतं की वारा इतके थेंब घेऊन येईल.”
त्याच्या फांद्या मोडून पडल्या, फुलं पाण्यात वाहू लागली.
लिली म्हणाली –
“मी तर सांगितलं होतं, थोडेसे थेंब पुरेसे होते. वर्षाराणीला हे ठाऊक आहे.”
ढगाचं दार उघडं पाहून आई धावत आली. तिने थेंबांना परत बोलावलं. सूर्यानेही हे पाहिलं आणि आपल्या किरणांनी वाऱ्याला उडवून नेलं.
उष्णतेनं त्रस्त होऊन थेंब एकामागून एक विरघळून गेले. काही गुलाबात लपले, काहींना परत घरी जायची संधी मिळाली.
बागेत पुन्हा उदासी पसरली.
जास्वंद म्हणालं – “इतके थेंब आपल्यासाठी योग्य नाहीत.”
बुगनविलिया दुःखाने बोलली – “लिली बरोबर होती. वर्षाराणीला उत्तम ठाऊक आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे.”
त्याची सगळी रंगीबेरंगी फुलं चिखलात गाडली गेली होती.
गुलमोहर थकल्या स्वरात म्हणाला –
“मी चुकीचा होतो. आपण सारे निसर्गाची लेकरं, तरी वर्षाराणीचा निर्णय समजू शकलो नाही.”
फुलं उदास झाली, पानंही उदास झाली. पण आता ते पुन्हा एकदा पावसाच्या थेंबांची योग्य वेळी परतण्याची प्रतीक्षा करू लागली.
-मच्छिन्द्र ऐनापुरे
