भारताच्या ईशान्येकडील राज्य मिझोराममध्ये साजरा केला जाणारा मिम कुट उत्सव हा मुळात कापणीचा उत्सव आहे. पण या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे लोक या दिवशी आपल्या समाजातील दिवंगत व्यक्तींनाही आदरांजली अर्पण करतात. अनोख्या आणि आनंददायी पद्धतीने साजरा होणाऱ्या या मिम कुट उत्सवाविषयी जाणून घ्या…
भारताच्या ईशान्येकडील रम्य आणि निसर्गसंपन्न अशा मिझोराम राज्यात दरवर्षी हर्षोल्हासाने साजरा होणारा मिम कुट उत्सव हा केवळ कापणीचा सण नाही, तर तो तेथील लोकांच्या आत्म्यातच रुजलेला सांस्कृतिक वारसा आहे. मिजो समाजासाठी हा उत्सव म्हणजे पूर्वजांच्या स्मृतींना सामूहिक अभिवादन आणि जीवनातील आनंदोत्सव यांचा अनोखा संगम आहे. हे पर्व आपल्याला शिकवतो की, जेव्हा एक समाज आपल्या भूतकाळाला विसरून न जाता उलट हास्य, गायन आणि नृत्याद्वारे त्याला उजाळा देतो, तेव्हा इतिहास फक्त स्मरणरंजन न राहता उत्सवात रूपांतरित होतो.
सांस्कृतिक आत्म्यात रुजलेला उत्सव
मिम कुट हा मुळात कापणीचा उत्सव आहे. मिजो भाषेत ‘मिम’ म्हणजे मका आणि ‘कुट’ म्हणजे उत्सव. त्यामुळे या सणाचा प्रत्यक्ष अर्थ आहे — मक्याच्या भरघोस पिकाचा उत्सव. मका हे इथल्या कृषिजीवनाचे प्रमुख प्रतीक असले, तरी या उत्सवाचा आशय केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. हा दिवस म्हणजे पूर्वजांच्या आठवणींना आनंदाने साजरे करण्याचा आणि शोकाला उत्सवात बदलण्याचा एक विलक्षण मार्ग आहे. त्यामुळे मिम कुट हा केवळ कापणीचा उत्सव नसून, तो मिजो संस्कृतीच्या जीवनतत्त्वज्ञानाचा आरसा आहे.
उत्साहाने पूर्वजांची आठवण
या उत्सवात त्या वर्षी किंवा भूतकाळात निधन झालेल्या सर्व वडीलधाऱ्यांची / पूर्वजांची आठवण काढली जाते. परंतु येथे शोकमग्नतेला स्थान नसते. ढोल-नगाऱ्यांच्या तालावर, गीत-नृत्यांच्या माधुर्यात, लोक पूर्वजांची स्मृती एकत्र वाटून घेतात. हेच मिम कुटचे वैशिष्ट्य आहे — स्मृतींना शोकात न ठेवता उत्सवात रुपांतरित करणे.
हेदेखील वाचा: श्रद्धा आणि उत्साहाचा सोहळा : देश-विदेशातील जन्माष्टमी उत्सव
उत्सव कसा साजरा केला जातो?
मिम कुटची सुरुवात होते मक्याची कणसं भाजून ते पूर्वजांच्या व देवतांच्या आत्म्यांना अर्पण करण्यापासून. त्यानंतर गावकरी एकत्र जमतात आणि चेराओ नृत्य सादर करतात. पुरुष आणि महिला पारंपरिक वेशभूषेत सजतात आणि ढोल, गोंग, बासरी यांच्या सुरेल साथीवर थिरकतात. संपूर्ण वातावरण उत्साहाने दुमदुमते. या उत्सवात पारंपरिक भोजनाची रेलचेल असते.
खास करून भातापासून बनविलेले ‘जू’ नावाचे स्थानिक पेय हे या सणाची खास ओळख आहे. हे पेय संपूर्ण गावात वाटले जाते. त्याचसोबत विविध पक्वान्ने सर्वजण मिळून बनवतात. मजेची गोष्ट म्हणजे — या जेवणात कोण काय आणतो, कोणाचे पक्वान्न आहे, हे कुणालाही महत्त्वाचे वाटत नाही. सर्व गोष्टी एकत्र केल्या जातात आणि त्याचा आनंद सामूहिकतेने घेतला जातो.
सामूहिकतेत सामाजिकतेची झलक
मिम कुट उत्सवात जात, धर्म, वर्ग, लिंग अशा कोणत्याही भेदभावाला जागा नसते. लहान-मोठे, पुरुष-स्त्रिया, सर्वजण एकत्र नाचतात, खातात, गातात. तरुण मंडळी आपले धनुर्विद्या, कुस्ती आणि इतर खेळांचे कौशल्य दाखवतात, तर वडीलधारी मंडळी गावकऱ्यांना आशीर्वाद देतात. या सणातून मिळणारा संदेश अगदी स्पष्ट आहे — सामूहिकता हीच खरी सामाजिकता.
पर्यटकांचे आकर्षण केंद्र
आज मिम कुट उत्सव फक्त मिजो लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो पर्यटकांचेही प्रमुख आकर्षण बनला आहे. देश-विदेशातून येणारे प्रवासी मिजो लोकांचे खाद्यपदार्थ, वेशभूषा, हस्तकला आणि जीवनशैली जवळून अनुभवतात. पर्यटक गावकऱ्यांप्रमाणे पोशाख परिधान करतात, लोकनृत्यांत सहभागी होतात आणि खऱ्या अर्थाने जनजातीय संस्कृतीचा अनुभव घेतात. मिझोराम पर्यटन विभागाने तर या उत्सवाला आपल्या आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनदर्शिकेत स्थान दिले आहे.
जागतिकीकरणाच्या युगातील मिम कुट
आज जगभरातील संस्कृती एकमेकांशी संवाद साधत आहेत. अशा काळात मिजो संस्कृती तिच्या उदारतेमुळे आणि खुलेपणामुळे अधिकाधिक लोकांना आकर्षित करते. मिम कुट आपल्याला शिकवतो की, जागतिकीकरणाच्या धुरकट लाटेतसुद्धा जर तुमची मुळे आपल्या संस्कृतीत घट्ट रोवलेली असतील, तर तुमची ओळख, तेज आणि उत्साह अबाधित राहतात. हा उत्सव म्हणजे जागतिक समाजातील भव्य सांस्कृतिक सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण.
यंदा कधी साजरा होणार उत्सव?
मिम कुट उत्सव दरवर्षी ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. स्थानिक श्रद्धेनुसार यंदा हा उत्सव १ ते ३ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. मिझोराममध्ये स्थानिक चांद्र पंचांग वापरले जाते, जे पिकांच्या स्थितीवर आणि सामूहिक सहमतीवर अवलंबून असते. त्यामुळे इंग्रजी दिनदर्शिकेनुसार या तारखा थोड्या पुढे-मागे होऊ शकतात.
एकंदरीत, मिम कुट हा केवळ मका पिकाचा उत्सव नाही, तर तो मिजो समाजाच्या संस्कृतीचे, सामूहिकतेचे आणि आनंदतत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.
-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली