मुलांनी संकल्पाचा षटकार ठोकताना व्यायाम, अभ्यास, खेळ, वाचन, जेवण आणि मोबाईलचा कमी वापर या गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात. मित्रांनो, नवीन वर्षात चांगल्या सवयी अंगीकारून आपण चांगले, शिस्तबद्ध आणि आनंदी बनूया!
२०२४ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. २०२५ मध्ये आपण शिस्तबद्ध दिनक्रम सुरू करण्याचा संकल्प करणार आहोत. व्यायाम, अभ्यास, खेळ, वाचन, जेवण आणि मोबाईलचा कमी वापर या सहा गोष्टी आपण नियमितपणे करण्याचे ठरवू. उरलेल्या काही दिवसांत मजा करू, मात्र १ जानेवारी २०२५ पासून आपला दिनक्रम पाळायचाच आहे. कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा, हे आई-बाबांसोबत ठरवायचं आहे. याचबरोबर, नवीन वर्षात आपण मुलांनी संकल्पांचा डबल षटकार मारणार असल्याचं त्यांनाही सांगायचं आहे.
१. मी व्यायाम करणार
मित्रांनो, रोज सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार किंवा योगा करण्याने शरीर तंदुरुस्त राहतं. यामुळे आपल्याला सर्दी, ताप, किंवा पचनाच्या तक्रारी होत नाहीत. डॉक्टरकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून १ जानेवारीपासून रोज लवकर उठून व्यायाम करण्याची सवय लावायची आहे. मुलांनी लक्षात ठेवावे कि, सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळीही चालेल. नियमित व्यायाम केल्याने आपल्याला जोमाने खेळता येतं, अभ्यासाचा कंटाळा होत नाही आणि चांगली भूकही लागते.
२. मी अभ्यास करणार
मोठं माणूस व्हायचं असेल तर अभ्यास अपरिहार्य आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा वैज्ञानिक हे सगळे अभ्यासानेच यशस्वी झाले आहेत. आपणही नित्यनेमाने अभ्यास केल्यास परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतो. अभ्यास हा बळजबरीने नाही तर आवडीने करायचा असतो. शाळेच्या अभ्यासाबरोबरच चित्रकला, संगीत, क्रीडा यांसारख्या कलांचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. यासाठी रोज एक वेळ ठरवून अभ्यास करायचा आहे. मुलांनी हा दुसरा षटकार जोरात मारायला हवा.
३. मी खेळ खेळणार
खेळ दोन प्रकारचे असतात – घरातले आणि मैदानातले. मुलांनी दोन्ही प्रकारचे खेळ भरपूर खेळायचे. घरातले खेळ (जसे कॅरम, बुद्धिबळ) आपली बुद्धी तल्लख करतात, तर मैदानावरील खेळ (जसे क्रिकेट, फुटबॉल) आपलं शरीर फिट ठेवतात. दोन्ही प्रकारचे खेळ ठराविक वेळेत खेळायचे आणि यामुळे मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे.
हे देखील वाचा: कागदाच्या मदतीने 3D कासव तयार करणे/ Making a 3D Turtle with the Help of Paper
४. मी वाचन करणार
आपण रोज थोडं वाचन करायचं आहे, पण शाळेच्या पुस्तकांपुरतंच नव्हे तर अवांतर वाचनही करायचं. गोष्टींची पुस्तके, बालसाहित्य, कविता किंवा कादंबऱ्या वाचायला हव्यात. वाचनामुळे आपली कल्पनाशक्ती वाढते आणि ज्ञानात भर पडते. रोज काही वेळ वाचनासाठी राखून ठेवायचा आहे.
५. मी पोटभर जेवण करणार
मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि, आईने केलेला चविष्ट स्वयंपाक आपण व्यवस्थित खाल्ला पाहिजे. वेळच्या वेळी जेवण करून आपण स्वतःला सुदृढ आणि तल्लख ठेवू शकतो. सर्व प्रकारच्या भाज्या, डाळी, फळं आनंदाने खायची आहेत. आपल्या आईबाबांना आपण चांगले मुलं असल्याचं दाखवण्यासाठी शिल्लक न ठेवता जेवण संपवायचं आहे.
६. मी मोबाईल कमी वापरणार
मुलांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळायचा आहे. केवळ शाळेच्या अभ्यासासाठी किंवा आवश्यक कामांसाठीच मोबाईल वापरायचा. तोही आई-बाबांच्या परवानगीने. सतत मोबाईल वापरल्यामुळे डोळे आणि डोकं दुखतं, चिडचिड होते, त्यामुळे या नवीन वर्षी मोबाईलचा वेळ कमी करून इतर उपयुक्त कामांवर लक्ष केंद्रित करायचं आहे.
मित्रांनो, नवीन वर्षात चांगल्या सवयी अंगीकारून आपण चांगले, शिस्तबद्ध आणि आनंदी बनूया!