गोष्ट क्रमांक 16 : मदतगार चीकू; खऱ्या मित्रांची ओळख संकटात होत असते, याची जाणीव करून देणारी गोष्ट वाचा; True friends are recognized in times of trouble

मदतगार चीकू

चंदनवनामध्ये एक शहाणा, चुणचुणीत आणि सगळ्यांच्या मदतीला धावणारा ससा राहत होता — चीकू! तो केवळ धावण्यात पटाईत नव्हता, तर शहाणपणातही सगळ्यांना मागं टाकत असे. कोणत्याही संकटात कुणी अडकले, की चीकू तिथं लगेच हजर! त्यामुळेच सगळे प्राणी त्याला “चंदनवनचा हिरो” म्हणत. चीकूचं नाव गावभर गाजलं होतं.

पण चीकूची ही लोकप्रियता काही प्राण्यांना खटकत होती. त्यात सगळ्यात आघाडीवर होता — मॉन्टी गाढव! मॉन्टीला चीकूची वाहवा सहन होत नव्हती. तो नेहमी चीकूविषयी इतरांच्या कानात वाईट भरत असे. त्याची टर उडवत असे. पण चीकू मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असे. त्याला माहीत होतं की भांडणं आणि रुसवेफुगवे यात वेळ घालवणं मूर्खपणाचं आहे.

मदतगार चीकू

एके दिवशी मॉन्टी आणि त्याचे काही मित्र — राकी कोल्हा, पॅडी लांडगा, जंपी माकड आणि मॅकी रानकुत्रा — फुटबॉल खेळत होते. खेळ रंगात आला होता. प्रत्येकजण आपली कमाल दाखवण्याच्या तयारीत होता.

“फुटबॉल मला दे, मी जोराची किक मारतो!” मॉन्टी ओरडला.

“नाही नाही, इकडे टाक! बघा माझा चमत्कार!” पॅडी गरजला.

“फेक माझ्याकडे! आकाशात उडवतो बॉल!” मॅकी थयथयाट करत म्हणाला.

जंपी गोंधळला. शेवटी त्याने डोळे बंद करून एक जबरदस्त किक मारली. फुटबॉल हवेत उडाला… आणि सगळे त्याच्या पाठोपाठ धावत सुटले.

पण अचानक, धावत धावत मॉन्टी एका खोल खड्यात कोसळला!

“वाचवा! वाचाव!” तो किंचाळू लागला.

त्याचे तथाकथित मित्र थांबले… पाहिलं… आणि एक एक करत मागे वळून तिथून पसार झाले. मॉन्टी खड्यात खोलवर अडकला होता. त्याचे पाय खरचटले होते, शरीर थकले होते, आणि मन पूर्णपणे खचले होते. तो मदतीसाठी किंकाळत राहिला.

हेदेखील वाचा: गोष्ट क्रमांक 14: खारुताई आणि मांजरीची पिल्लं; this story, because it teaches the true nature of friendship!

तेवढ्यात चीकू ससा त्याच मार्गानं जात होता. त्याच्या कानांपर्यंत मॉन्टीच्या किंकाळ्या पोचल्या. क्षणाचाही विलंब न करता चीकू धावत गेला. खड्यात खाली पाहिलं, तर मॉन्टी वेदनेत विव्हळत होता.

“मॉन्टी! अरे दोस्ता, तू इथे? काय झालं?” चीकूने काळजीने विचारलं.

मॉन्टीने शरमेने सगळी कहाणी सांगितली. “चीकू… मला मदत कर, कृपया! मला वाटतं, या जंगलात तूच आहेस जो मला यातून बाहेर काढू शकतोस.”

“मित्रा, काळजी करू नकोस. मी काही तरी करतोच!” चीकू म्हणाला आणि धावत आपल्या भल्यामोठ्या मित्राकडे — गोलू हत्तीकडे — गेला.

“गोलू, लवकर चल! एक मोठ्ठं काम आहे. आणि हो, एक लांब दोरी घेऊन चल!” चीकू म्हणाला.

गोलू त्या वेळेस झोपेच्या अधीन होता. “अरे, झोपू दे ना जरा! काय ही सततची धावपळ! तू पण ये झोप माझ्या शेजारी” तो मिश्कीलपणे म्हणाला.

“गोलू! आता आळस करण्याची वेळ नाही, कामाची वेळ आहे. मॉन्टी खड्यात अडकला आहे. त्याला वाचवणं गरजेचं आहे!” चीकूने कडक सुरात सांगितलं.

“मॉन्टी? जो तुझी कायम निंदा करतो तोच?” गोलूने आश्चर्याने विचारलं.

“अरे, त्या गोष्टी विसर. संकटात असलेल्या जीवाला मदतीची गरज असते. तेव्हा भूतकाळाची उजळणी नको. येतोस का?” चीकू म्हणाला.

गोलू हत्ती अखेर तयार झाला. दोरी घेऊन चीकूच्या मागे लागला.

मदतगार चीकू

दोघंही लवकरच खड्याजवळ पोचले.

“मॉन्टी! आता घाबरू नको. गोलू आला आहे. तो दोरी टाकतोय. ती घट्ट पकड आणि वर चढायचा प्रयत्न कर!” चीकू जोरात म्हणाला.

मॉन्टी थकलेला होता, पण आशेने उजळला. त्याने दोरी दातात पकडली आणि चढायला सुरुवात केली. पण मधेच दोरी सुटली आणि तो परत धपकन खाली पडला.

“पुन्हा प्रयत्न कर!” चीकूने आवाजात आश्वासकता मिसळून सांगितलं.

अखेर दोन-तीन प्रयत्नांनंतर मॉन्टी खड्ड्यातून सुखरूप बाहेर आला.

त्याच्या डोळ्यांत पाणी होतं. तो चीकूकडे बघत म्हणाला, “माफ कर रे. मी तुझ्याबद्दल खूप वाईट बोललो. पण आज तूच माझा खरा मित्र ठरलास. मी तुझ्या मैत्रीला पात्र नाही, पण तरीही तुला माझा मित्र म्हणायचं आहे.”

चीकू हसून म्हणाला, “मित्रा, संकटात मदत करणं हीच खरी प्राणुसकी. आपण चांगले मित्र आहोतच.”

मॉन्टी गोलूकडे बघून म्हणाला, “तुला पण मनापासून धन्यवाद, गोलू! तुझ्याशिवाय मी इथं पोचूच शकलो नसतो.”

“पाहिलं का? खरे मित्र असे असतात – संकटात पाठीशी उभे! उगाचं नुसते ‘मित्र’ म्हणून मागं फिरणारे नाही.”

मॉन्टीच्या चूक लक्षात आली. त्याने पुन्हा दोघांची माफी मागितली.

मग गोलूने चीकूला आपल्या पाठीवर घेतलं, मॉन्टी त्यांच्या सोबत चालू लागला, आणि हे तिघं मित्र हास्य-विनोद करत पुन्हा चंदनवनाच्या दिशेने निघाले.

या गोष्टीतून काय बोध घ्यावा :
खऱ्या मित्रांची ओळख संकटात होते. चांगुलपणा आणि मदतीची भावना या गुणांनीच एक सच्चा नायक ओळखला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *