भारतीय संस्कृतीतील देवतांमध्ये सर्वात प्राचीन, अनाकलनीय आणि अद्वितीय असा जो देव आहे, तो म्हणजे भगवान शंकर, महादेव, शिवशंभू. त्यांचं रूप एका क्षणी विश्वाला नाशाकडे घेऊन जाणारं रुद्रतत्त्व, तर दुसऱ्या क्षणी शांत, ध्यानस्थ, करुणामय अशा योगेश्वराचं प्रतीक. अशा या भोळ्याभाळ्या शंकराचे विविध ठिकाणी उभे असलेले दिव्य आणि भव्य विग्रह केवळ स्थापत्यशास्त्राचे नमुने नसून, त्या प्रत्येक प्रतिमेमध्ये भक्ताच्या मनाचा विश्वास, श्रद्धा आणि आत्मिक उन्नती यांचे प्रतिबिंब दिसून येते.
श्रावण महिना म्हणजेच भक्तीचा, उपासनेचा आणि शिवमहिमेच्या गुणगानाचा काळ. या काळात देशभरातील असंख्य शिवभक्त विविध शिवतीर्थांची यात्रा करतात. अशाच काही शिवप्रतिमांचे दर्शन घडवणाऱ्या प्रमुख स्थळांविषयी आपण आता जाणून घेणार आहोत – जिथे श्रद्धा आकार धारण करते, आणि मूर्तीमधून भक्तांच्या मनाला आत्मशांतीचा अनुभव मिळतो.
मुरुदेश्वर महादेव, कर्नाटक – सागरकिनाऱ्यावरील शिवतत्त्व
कर्नाटकमधील भटकल तालुक्यात, निळ्याशार अरब सागराच्या किनाऱ्यावर, तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले एक मनोहारी ठिकाण – मुरुदेश्वर महादेव मंदिर. ‘मुरुदेश्वर’ हे नावच भगवान शिवाचे दुसरे रूप आहे. येथील १२३ फूट उंच भव्य शिवमूर्ती नुसती पाहिली तरी अंगावर शहारे येतात. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या या मूर्तीची निर्मिती तब्बल २ वर्षांमध्ये पूर्ण झाली. ही प्रतिमा देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच शिवमूर्ती मानली जाते.
अरब सागराच्या लाटांनी स्पर्शलेली ही मूर्ती पाहताना क्षणभर वेळ थांबतो, आणि वाटते की स्वर्ग खाली उतरला आहे. इथे वर्षभर भाविकांची आणि पर्यटकांची मांदियाळी असते. मुरुदेश्वर हे केवळ तीर्थक्षेत्र नव्हे, तर भक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा अद्वितीय संगम आहे.
सर्वेश्वर महादेव, वडोदरा – सरोवरातील दिव्यता
गुजरातमधील वडोदरा शहराच्या मध्यभागी स्थित असलेले सूरसागर तलाव, आणि त्याच्या मध्यवर्ती भागात उभी असलेली १२० फूट उंच सर्वेश्वर महादेव यांची अष्टधातूची दिव्य प्रतिमा. या मूर्तीला आधार देणारे २३ खांब सरोवराच्या खोलगट तळाशी खोलवर रोवलेले आहेत. या भव्य मूर्तीचे निर्माण कार्य ६ वर्षे अखंड चालले. या ठिकाणी केवळ शिवभक्तच नव्हे, तर विविध धर्मीय पर्यटकही भक्तिभावाने नतमस्तक होतात. अहमदाबादपासून फक्त ११२ किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. या मूर्तीभोवतीची निळसर तलावाची पार्श्वभूमी आणि शहराच्या कौलारू आकाशाखाली उभा असलेला हा दिव्य रूपवट – एक अलौकिक आध्यात्मिक अनुभव घडवतो.
आदियोगी शिव, कोयंबटूर – योगाचे प्रतीक
तामिळनाडूमधील कोयंबटूरपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेली आदियोगी शिवाची प्रतिमा, ही केवळ एक मूर्ती नसून योगतत्त्वाची साक्षात मूर्तिमंत अभिव्यक्ती आहे. जगातील सर्वात मोठ्या मुखप्रतिमांपैकी एक असलेली ही मूर्ती ११२ फूट उंच आणि ५०० टन वजनाची आहे. विशेष म्हणजे, ही मूर्ती धातूच्या तुकड्यांपासून बनवलेली असून, यात सिमेंट किंवा वाळूचा कोणताही वापर नाही. ही रचना ईशा फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे साकारली गेली आणि आज ती योग, साधना आणि मुक्तीच्या वाटेवर प्रेरणा देणारी आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची अधिकृत नोंद झालेली आहे. ही मूर्ती पाहताना मनात विचार येतो – शिव म्हणजे योग, आणि योग म्हणजे शिव.
सिद्धेश्वर महादेव, सिक्कीम – पूर्वेकडील वैभव
सिक्कीममधील सोलोफोक टेकडीवर उभारलेली सिद्धेश्वर महादेवाची ८७ फूट उंचीची बैठकीतील मूर्ती, तिच्या पांढऱ्या शुभ्र रंगामुळे दूरवरूनच श्रद्धेचे आकर्षण ठरते. आधारसहित तिची एकूण उंची १०८ फूट आहे. स्थानिक लोक यांना ‘नामची महादेव’ आणि ‘किरतेश्वर’ या नावांनी पूजतात. या प्रांगणात शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती तसेच चार धाम – बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथ, रामेश्वरम यांची देखील कलात्मक स्थापनेत मांडणी केलेली आहे. यामुळे येथे आलेले भाविक एकाच ठिकाणी अनेक तीर्थस्थळांचा अनुभव घेऊ शकतात. पूर्व भारतात शिवभक्तीसाठी हे ठिकाण म्हणजे आस्था आणि स्थापत्य सौंदर्याचे अपूर्व उदाहरण.
हर की पैड़ीचे शिव, हरिद्वार – गंगा आणि शंकराचा संगम
हरिद्वारमधील हर की पैड़ी हे गंगेच्या किनाऱ्यावरचे सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. येथे समोरच असलेल्या स्वामी विवेकानंद उद्यानामध्ये उभी असलेली १०० फूट उंच शिवमूर्ती पर्यटकांना दूरवरूनच खुणावते. या ठिकाणी संध्याकाळी केले जाणारे गंगेचे आरती दर्शन आणि त्याचवेळी शिवाचे सान्निध्य यामुळे भक्तीचा अनुभव दुप्पट होतो. गंगेच्या लाटांमध्ये दिव्यांची प्रतिबिंबे, घंटानाद, मंत्रोच्चार आणि आकाशाकडे पाहणाऱ्या शिवमूर्तीचा आत्मविसर्जन करणारा अनुभव – हे सर्वच मनावर गारूड करतं.
इतर भव्य शिवप्रतिमा – शिवाचे विविध दर्शन
शिव केवळ एकाच रूपात मर्यादित नाहीत. भारतभर विखुरलेल्या त्यांच्या अनेक भव्य मूर्ती हे सांगतात की श्रद्धेची सीमा नाही आणि भक्तीचं रूप सर्वव्यापी आहे:
* जबलपूर (मध्य प्रदेश) – येथे ७६ फूट उंच शिवमूर्ती असून तिच्या सभोवती १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली आहे.
* बेंगळुरू (कर्नाटक) – शिवोहम मंदिरातील ६५.६ फूट उंचीची शिवप्रतिमा, ज्यामागे हिमालयाची प्रतिकृती आहे.
* द्वारका (गुजरात) – नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये ८२ फूट उंच शिवमूर्ती आहे.
शिवमूर्ती : स्थापत्य की साधना?
या सर्व प्रतिमा केवळ उंच अशा शिल्पकृती नाहीत. त्या भक्ताच्या मनातील विचारांना दिशा देतात, साधनेला प्रेरणा देतात आणि अस्तित्वाच्या अर्थाकडे घेऊन जातात. प्रत्येक मूर्तीच्या पाठीमागे असते भक्तांच्या भावनांचं आर्त स्वरूप, शिल्पकारांच्या हातातील करामत आणि काळाबरोबर उभं राहिलेलं श्रद्धेचं सामर्थ्य. शिवाचे रूप म्हणजे शून्य आणि अनंताचा संगम. आणि भारतभर विखुरलेल्या या भव्य मूर्ती त्याच शून्य-अनंताला दृष्टिगोचर करतात.
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर अशा दिव्य मूर्तींचा स्मरण केवळ एक धार्मिक कृती नाही, तर ती आपल्या सांस्कृतिक जडणघडणीतली मूळं शोधण्याची एक संधी आहे. या शिवमूर्ती म्हणजे वेळेच्या प्रवाहात अखंड उभ्या असलेल्या श्रद्धेच्या दीपस्तंभांसारख्या आहेत – जे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात, आणि अंतःकरणात शांततेची ज्योत चेतवतात. शिवशंभो! हर हर महादेव!
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली