जास्वंद: गणपतीचे आवडते फूल – फुलांचे देखणे सामर्थ्य; जास्वंद फक्त लालच नाही तर 70 पेक्षा अधिक रंगांमध्ये मिळतो

गणपतीचे आवडते फूल

आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले की, रोजच्या पूजेसाठी रंगीबेरंगी फुलांची माळ तयार केली जाते. पण प्रत्येक देवाच्या पूजेसाठी काही खास फुलं असतात, नाही का? तर मग, गणपतीबाप्पाचं आवडतं फूल कोणतं? हो, बरोबर! लालसर, टवटवीत आणि सुंदर असं जास्वंद!

जास्वंद का आवडतो बाप्पाला?
गणपती बाप्पा हे बुद्धीचे, यशाचे आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात. जास्वंदाचं फूलसुद्धा अगदी तसंच – तेजस्वी, लालसर आणि शुभ! म्हणूनच बाप्पाला हे फूल अर्पण केलं जातं. गणेश चतुर्थीच्या काळात तर या फुलांची बाजारात खूपच मागणी असते. पण केवळ त्या काळातच नाही, तर वर्षभर पूजेसाठी आणि सजावटीसाठी याचा उपयोग केला जातो.

मलेशिया देशाचं राष्ट्रीय फूल

जास्वंद म्हणजे काय?
जास्वंद हे एक फुलझाड आहे. याला इंग्रजीत Hibiscus म्हणतात आणि शास्त्रीय भाषेत त्याचे नाव आहे – Hibiscus rosa-sinensis. हे झाड मूळचं चीनमधील आहे, पण भारतातही हे झाड अगदी सर्वत्र दिसतं – अंगणात, बागेत, शाळांच्या परिसरात किंवा मंदिरांच्या आजूबाजूला. जास्वंद हे फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात आढळतं. विशेष म्हणजे, मलेशिया देशाचं राष्ट्रीय फूलही जास्वंद आहे!

हे झाड २ ते ५ मीटर उंच वाढतं. त्याची पाने मोठी, हिरवीगार आणि चमकदार असतात. फुलं मात्र झाडाच्या टोकाला येतात आणि ती घंटेसारखी दिसतात. या फुलाच्या पाकळ्यांतून पुञकेसर बाहेर आलेले दिसतात, त्यामुळे ते खूपच आकर्षक वाटतात.

हेदेखील वाचा: डोनाल्ड डकला 2025 मध्ये पूर्ण होत आहेत 91 वर्षे; जिंदगी तूफानी आहे… जिथे आहे डोनाल्ड डक; Life is stormy… where Donald Duck is

किती रंगीत असतो जास्वंद?
आपल्याला सर्वसाधारणपणे जास्वंदाचा लाल रंग माहित आहे. पण तुला माहिती आहे का? जास्वंद फक्त लालच नाही तर ७० पेक्षा अधिक रंगांमध्ये मिळतो! पिवळा, गुलाबी, नारिंगी, पांढरा, अगदी गडद जांभळाही! वैज्ञानिकांनी जास्वंदाच्या फुलांचे अनेक नवीन रंग तयार केले आहेत.

आणखी गंमत सांगू का? काही जास्वंद फुलं अगदी मुकुटासारखी असतात. म्हणूनच याला शोभेच्या फुलांमध्येही गणना होते. एक विशेष गोष्ट म्हणजे, जास्वंदाच्या फुलांचा उपयोग बुटाला चकाकी आणण्यासाठीही होतो. म्हणूनच इंग्रजीत त्याला “Shoe Flower” असं गोंडस नाव मिळालं आहे.

झाडाची खास रचना
झाडाची उंची: २ ते ५ मीटर
पाने: मोठी, दंतुर आणि हिरवीगार
फुलं: एकट्या फांदीच्या टोकाला येतात
रचना: ५-७ निदले, मोठं पाकळ्यांचं मुकुट
फळं: संकरित फुलं फळ देत नाहीत, पण नैसर्गिक वन्य जास्वंदाला फळं येतात

मलेशिया देशाचं राष्ट्रीय फूल

औषधी उपयोग – जास्वंद म्हणजे निसर्गाचं औषध!
जास्वंद फक्त देवपूजेसाठी नाही, तर औषध म्हणूनही उपयोगी आहे!
मुळे: थोडी तिखट आणि कडवट, पण खोकला, ताप यावर गुणकारी
पाने: वेदना कमी करणारी, आणि सौम्य रेचक
फुलं: वेदनाशामक, आणि यापासून अँथोसायनिन नावाचं रंगद्रव्य मिळतं. हे रंग खाण्यात वापरतात!

आणखी एक उपयुक्त उपयोग म्हणजे केसांसाठी तेल!
फुलांच्या पाकळ्यांचा रस ऑलिव्ह तेलात मिसळून मंद आचेवर उकळतात, तेव्हा तयार होणारे तेल केसांची वाढ आणि केसांना रंग देण्यासाठी फार उपयोगी असते. हे नैसर्गिक केसांचे टॉनिकच आहे!

विज्ञान आणि गंमत एकत्र
जास्वंदाची एक गंमत म्हणजे – आम्ल (acid) टाकल्यावर याच्या पाकळ्यांचा रंग बदलतो! आम्ल टाकलं, तर गुलाबी रंग. आम्लारी (alkali) टाकलं, तर हिरवा रंग. म्हणजे जास्वंदाचं फूल केवळ सुंदर नाही, तर विज्ञानासाठीही उपयोगी आहे. त्यामुळे अनेक विज्ञान प्रकल्पांमध्ये याचा उपयोग केला जातो.

थोडक्यात सांगायचं झालं तर…
जास्वंद हे गणपतीबाप्पाचं आवडतं फूल असलं, तरी ते आपल्या दैनंदिन आयुष्यातही खूप महत्त्वाचं आहे. त्याचं सौंदर्य, विविध रंग, औषधी गुणधर्म, विज्ञानातील उपयोग – हे सगळं पाहिलं की हे फूल खरंच विशेष वाटतं. म्हणूनच, पुढच्या वेळेस जास्वंदाचं फूल पाहिलंस, की फक्त बघून आनंद घेऊ नकोस – त्यामागची सुंदर माहितीही लक्षात ठेव! आणि आपल्या छोट्या बागेत एक तरी जास्वंदाचं झाड नक्की लाव!

-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि.सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *