भारतीय महिला क्रिकेट संघाच्या यशगाथेत अलीकडेच एक नवे तेजस्वी पान जोडले गेले आहे—ते म्हणजे श्री चरणी या नवोदित खेळाडूचे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी भारताच्या जर्सीत मैदानात उतरून तिने आपली प्रतिभा आणि ताकद दाखवून दिली आहे. तिच्या गोलंदाजीच्या प्रहाराने केवळ इंग्लंडच्या फलंदाजांनाच नव्हे, तर समस्त क्रीडाजगतालाही आश्चर्यचकित केले.
२८ जून २०२५ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात, स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ९७ धावांनी भव्य विजय मिळवला. या विजयामागची एक प्रमुख शिल्पकार म्हणजे श्री चरणी, जिने आपल्या पदार्पणातच ४ बळी घेत मैदानात खळबळ माजवली. तिच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडच्या फलंदाजांना अडकवून तिने भारताला मोठा विजय मिळवून दिला. ही केवळ तिच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात होती, पण तिच्या खेळात असलेल्या आत्मविश्वासामुळे ती भविष्यातील स्टार ठरणार, हे स्पष्ट दिसत होते.
आंध्र प्रदेशातील वाय.ए.आर.–कडप्पा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात, एमिल्ले नावाच्या गावात ४ ऑगस्ट २००४ रोजी श्री चरणीचा जन्म झाला. तिचे वडील चंद्रशेखर रेड्डी हे रायलसीमा थर्मल पॉवर प्रकल्पात एक सामान्य कर्मचारी म्हणून काम करत होते. खेडेगावातील मुलगी, मर्यादित साधनसंपत्ती, पण स्वप्ने मात्र आभाळाएवढी — ही श्री चरणीची ओळख ठरली.
लहानपणी तिला बॅडमिंटन आणि खो-खो यासारख्या खेळांमध्ये रुची होती. पण जेव्हा तिने स्मृती मंधाना आणि युवराज सिंगसारख्या खेळाडूंच्या कामगिरीकडे पाहिले, तेव्हा तिच्या मनात क्रिकेटची ज्वाला पेटली. तिच्या काकांनी — किशोरकुमार रेड्डी यांनी — तिच्यातील क्षमतेची ओळख पटवली आणि तिला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने अंडर-१९ भारतीय संघात स्थान मिळवले.
हेदेखील वाचा: गोष्ट क्रमांक 15: सिंबाला मिळालं आपलं घर / Simba found his home
डावखुरी फलंदाजी आणि डावखुरी फिरकी गोलंदाजी ही तिची खासियत ठरली. ‘महिला प्रीमियर लीग २०२५’ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने तिच्यावर ५५ लाख रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सामील करून घेतले. तिच्या पदार्पणाच्या सामन्यातच आरसीबीविरुद्ध तिने एका षटकात दोन बळी घेतले आणि चाहत्यांना थक्क केले. फायनल सामन्यात मुंबईविरुद्ध देखील तिने दोन विकेट्स घेत आपल्या कामगिरीत सातत्य दाखवले. ‘ए’ श्रेणी क्रिकेट स्पर्धेत तिने ‘इंडिया बी’ संघाविरुद्ध ५ बळी घेतले आणि एकूण तीन सामन्यांमध्ये ९ विकेट्स मिळवून दिल्या.
एप्रिल २०२५ मध्ये श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय त्रिकोणी मालिकेसाठी तिची भारतीय वरिष्ठ संघात निवड झाली. २७ एप्रिल रोजी श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळताना तिने ६ बळी घेतले आणि आपली दर्जेदार कामगिरी सिद्ध केली.
तिच्या या यशामागे तिच्या वडिलांनी सातव्या इयत्तेत तिला दिलेली पहिली क्रिकेट किट, तिच्या काकांचे मार्गदर्शन आणि तिच्या स्वतःच्या जिद्दीचा मोठा वाटा आहे. एका मुलाखतीत ती म्हणते, “मी अनेक खेळांमध्ये सहभागी झाले, पण क्रिकेटच असा खेळ आहे, जो पुन्हा पुन्हा माझ्या जीवनात परत आला. माझ्या काकांनी मला प्रत्येक संकटाचा सामना कसा करायचा हे शिकवलं. आज मी जे काही आहे, त्यामागे त्यांचे अमूल्य योगदान आहे.”
श्री चरणी केवळ एक क्रिकेटपटू नाही, तर ती नव्या भारतातील युवतींची प्रेरणास्रोत आहे. छोट्याशा खेडेगावातून निघून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावणारी ही मुलगी प्रत्येक ग्रामीण भागातील मुलीला हे शिकवते की — जर जिद्द असेल, तर यश दूर नाही!
तिचा हा प्रवास प्रत्येक तरुणीला स्वप्न बघण्याची आणि त्यासाठी लढण्याची उमेद देतो. भविष्यात ती भारतासाठी विश्वचषक जिंकवेल, अशी अपेक्षा देशवासीय करत आहेत. कारण श्री चरणी ही केवळ एक नाव नाही, तर भारताच्या क्रिकेटमधील नवे स्वप्न आहे!
-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि.सांगली