एका दुर्गम डोंगररांगेत, निसर्गाच्या कुशीत दरवर्षी फक्त काहीच दिवसांसाठी एक अलौकिक सौंदर्य फुलतं — शिरुई लिली. संपूर्ण पृथ्वीतलावर हे एकमेव फूल आहे, जे फक्त भारताच्या, तेही मणिपूर राज्याच्या शिरुई डोंगरावर उमलतं. त्याच्या दर्शनासाठी निसर्गप्रेमी हजारो मैलांचा प्रवास करून, उंच पर्वतरांगांत पायपीट करतात.
हे गुलाबी शुभ्र फुलं केवळ फुलतं नाही, तर पाहणाऱ्याच्या मनात एक अमूर्त भावना जागवून जातं — जणू काही सौंदर्य, निसर्ग, आणि अध्यात्म या तिघांचं एकत्रित दर्शन घडवणारा क्षण.
हेदेखील वाचा: गार्डन… अद्भुत… आकर्षक; बागांचे विश्व; भारतातल्या 6 प्रसिद्ध बागांची माहिती जाणून घ्या
सुमारे ६,५०० ते ८,५०० फूट उंच शिरुई डोंगरात फुलणारं हे फूल फक्त मे व जून महिन्यांत दिसतं. एका सडसडीत देठावर सहा-सात पाकळ्यांचे हे फूल फिकट गुलाबी रंगाचं असतं, आणि त्याच्या टोकांवर दिसणारी निळसर झाक स्थानिकांनी “आसवांची थेंब” म्हणून ओळखली आहे. त्याच्या मंद व मोहक सुगंधात एक गूढ आकर्षण दडलेलं असतं.
या फुलाचं वैज्ञानिक नाव आहे Lilium mackliniae. वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. फ्रँक किंगडन वार्ड यांच्या पत्नी जीन मॅकलिन यांनी १९४६ मध्ये या फुलाचं प्रथम दर्शन घेतलं आणि त्यांच्या स्मरणार्थच त्याचं नामकरण झालं.
१९५० मध्ये लंडनमधील रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटीने या फुलाला प्रतिष्ठेचं बक्षीस देत आंतरराष्ट्रीय मान्यता दिली. १९८९ मध्ये हे फूल मणिपूरचं राजकीय फूल म्हणून घोषित झालं.
शिरुई लिली हे केवळ एक वनस्पती नाही, ती मणिपूरच्या संस्कृतीची जिवंत खूण आहे. तिथली तांगखुल नागा जमात या फुलाला देवाचं वरदान मानते. दरवर्षी २० ते २४ मे दरम्यान, मणिपूर पर्यटन विभाग शिरुई फेस्टिव्हलचं आयोजन करतो. या उत्सवात लोकनृत्य, संगीत, हस्तकला आणि या फुलाभोवती गुंफलेली लोककथांची रंगत असते.
परंतु या अनमोल देणगीवर आता संकटाची सावली घोंगावत आहे. हवामान बदल, अतिक्रमण आणि मानवी हस्तक्षेपामुळे शिरुई लिलीच्या अस्तित्वावरच गदा येऊ लागली आहे. हे फूल केवळ सौंदर्याचं प्रतीक नाही, तर भारताची जैवविविधता, संस्कृती, आणि निसर्गावरील प्रेम याचं प्रतीक आहे. त्यामुळे याचं संवर्धन ही आपली जबाबदारी आहे.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली