गगनाला भिडलेली शिखरं माणसाला नेहमीच आकर्षित करतात. परंतु ती केवळ पाहण्यापुरतीच असतात; त्यांना सर करायची हिंमत काही जणांमध्येच असते. अशाच दुर्मिळ साहसवीरांपैकी एक नाव म्हणजे पुण्याचे जितेंद्र गवारे. वयाच्या ४२व्या वर्षी त्यांनी जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर माउंट मकालू (८,४८५ मीटर) सर करत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ही केवळ एक चढाई नव्हती – हा होता दृढ संकल्प, अथक मेहनत, आणि आत्मविश्वासाचा विजय! हिमालयातील सर्व आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या शिखरांवर यशस्वी चढाई करणारे ते महाराष्ट्रातील पहिले गिर्यारोहक ठरले आहेत.
हिमालयाच्या कुशीत उमटलेला जिद्दीचा श्वास:
‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या माध्यमातून गिर्यारोहण करणाऱ्या जितेंद्र गवारे यांनी १० मे रोजी सकाळी ४.५० वाजता माउंट मकालूवर यशस्वी चढाई केली. त्याआधी त्यांनी यशस्वीरीत्या माउंट एव्हरेस्ट, कंचनजंगा, ल्होत्से, धौलागिरी, मनास्लु आणि अन्नपूर्णा-१ ही दुर्गम शिखरे सर केली होती. त्यांच्या या प्रवासात निसर्गाचे असंख्य आव्हानं, जीवघेणी थंडी, विरळ ऑक्सिजन आणि तुटपुंजे साधनसामग्री यांचा सामना करावा लागला. पण तरीही त्यांच्या डोळ्यांत फक्त एकच स्वप्न होतं – शिखरावर झेंडा रोवायचा!
पुरस्कार, पण त्याहूनही मोठं यश – प्रेरणा देणं:
जितेंद्र गवारे यांना त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ‘शिव छत्रपती पुरस्कार’ मिळालेला आहे. मात्र त्यांच्या यशाचं खरं मोल आहे – ते आजच्या तरुणांसाठी एक आदर्श प्रेरणास्त्रोत बनले आहेत. गिर्यारोहण ही केवळ साहसाची परीक्षा नाही, ती संयमाची, शिस्तीची आणि मनोबलाचीही कसोटी असते – आणि या कसोटीत जितेंद्र गवारे पुन्हा पुन्हा यशस्वी ठरले आहेत.
या यशामागे होते समर्थ मार्गदर्शन:
ही अविश्वसनीय कामगिरी शक्य झाली ती राष्ट्रीय साहस पुरस्कार विजेते उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनामुळे. त्यांनी गवारे यांच्या विनम्रता, समर्पण आणि शिस्तीचे विशेष कौतुक केले आहे. झिरपे म्हणतात, “माउंट मकालू हे केवळ एक शिखर नाही, ते गवारे यांच्या अथक परिश्रमाचे, न डगमगणाऱ्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. या विजयामुळे महाराष्ट्राच्या गिर्यारोहण इतिहासात एक सुवर्णक्षण नोंदवले गेले आहे.”
शिक्षणसंस्थेचा मोलाचा हातभार:
गवारे यांच्या या मोहीमेसाठी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (डीपीयू) कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील यांनी विशेष सहकार्य केले. त्यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळामुळेच ही मोहीम यशस्वी होऊ शकली.
माउंट एव्हरेस्टपेक्षाही कठीण – आमा डबलाम सर करणारा साहसी:
२०१९ साली जितेंद्र गवारे यांनी कंचनजंगावर तिरंगा फडकावला आणि माउंट आमा डबलाम (६८१२ मीटर) शिखर सर केले. हे शिखर जरी एव्हरेस्टपेक्षा कमी उंचीचे असले तरी चढाईच्या दृष्टीने अधिक कठीण मानले जाते. पुढे, १४ मे २०२२ रोजी त्यांनी माउंट ल्होत्से (८५१६ मीटर) हे जगातील चौथे उंच शिखरही सर केले.
गवारे यांची प्रेरणा – नव्या पिढीची दिशा:
आजच्या धावपळीच्या जीवनात, डिजिटल विश्वात हरवलेल्या तरुणांना गवारे यांचा प्रवास स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा देतो. ‘अशक्य काहीच नाही’ हे ते आपल्या कृतीतून जगाला दाखवतात.
शेवटी एवढंच – शिखरं सर करणं म्हणजे यश नव्हे, ती असते जग जिंकण्याची सुरुवात!
जितेंद्र गवारे यांची कथा ही केवळ एका गिर्यारोहकाची नाही, ती आहे जिद्दी, शौर्य, आणि भारताच्या साहसयात्रेची प्रेरणादायी गाथा. अशा वीराला मानाचा मुजरा!
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली