प्रस्तावना: जंगलातली गोष्ट म्हणजे निसर्गातल्या निरागस मैत्रीचा सुंदर धडा असतो. ही गोष्ट खारुताई आणि मांजरीच्या पिल्लांमधील अनोख्या नात्याची आहे. भीती, धाडस, समजूत आणि प्रेम यांचा सुंदर संगम यात पाहायला मिळतो. मुलांनी ही गोष्ट वाचावी, कारण ती मैत्रीचं खरं रूप शिकवते!
एकदा एका हिरव्यागार जंगलात खूप सारे प्राणी राहायचे. त्या जंगलात एका मोठ्या झाडाजवळ खारुताईचं एक घरटं होतं. खारुताई रोज सकाळी झाडांवर उड्या मारत खेळायची, सर्रकन झाडावरून खाली यायची, पुन्हा वर जायची!
असाच एक दिवस. खारुताई खेळत असताना तिला वाटलं, एका झुडपामागे काहीतरी हालचाल होतेय. ती हळूहळू तिकडे गेली आणि काय आश्चर्य! तिथं चार छोटीशी मांजरीची पिल्लं लोळत होती. खारुताई थोडीशी घाबरली – ‘कुठं तर मांजरी तर नाही ना? ती आली तर मला खाऊन टाकेल!’ पण एका पिल्लाने तिला जवळ बोलावलं, आणि खारुताई थबकली.
हेदेखील वाचा: गोष्ट क्रमांक 13: गणिताचे ज्ञान / Knowledge of Mathematics
ती हळूहळू त्यांच्याजवळ गेली. पिल्लं खूपच गोंडस होती. खारुताई त्यांच्यासोबत खेळायला लागली. ती म्हणाली, “अरे हो! पण तुम्ही इकडे कधी आलात? आणि कुठून आलात?”
एक पिल्लू म्हणालं, “आम्हाला जन्माला येऊन काहीच दिवस झालेत. काल रात्री आई आम्हाला दातात धरून इथं घेऊन आली.”
खारुताईच्या लक्षात आलं – मांजरीण आपल्या पिल्लांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा बदलत असते. म्हणूनच कदाचित ही पिल्लं काल रात्री इथं आली असतील.
खारुताई त्यांच्या भोवती ‘किट-किट’ करत फिरत होती. पण तेवढ्यात एक काळं सावट तिच्या दिशेने झेपावलं! ती होती – ती मांजरीण! पिल्लांची आई! ती खूप भुकेली होती आणि खारुताईला पकडून खाणार होती.
पण त्या छोट्या पिल्लांनी आपल्या गोड आवाजात गोंधळ घालायला सुरुवात केली – “आई, आई, नको ना… ही आमची मैत्रीण आहे!”
मांजरीण थांबली. पिल्लांचं ऐकून तिने खारुताईला काहीही केलं नाही. उलट तिने वचन दिलं – “मी यापुढे या खारुताईला काहीही इजा करणार नाही.”
पिल्लांनी खूश होऊन टाळ्या वाजवल्या! आणि मांजरीने खारुताईची माफी मागितली – “तुझ्यावर धावले, ही चूकच झाली. तू तर माझ्या मुलांची प्रिय मैत्रीण आहेस!”
त्या दिवसापासून खारुताई आणि मांजरीची पिल्लं खूप चांगले मित्र झाले!
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली