बिहारच्या एका लहानशा गावात राहणारा एक साधा मुलगा. वडील शेतकरी. घरात फारसे पैसे नाहीत, ना क्रिकेटची कोणतीही पार्श्वभूमी. पण डोळ्यात एक स्वप्न होतं – क्रिकेटमध्ये भारताचं नाव मोठं करायचं. हे स्वप्न होतं वैभव सूर्यवंशीचं.
आणि आज हेच स्वप्न त्याने साकार करून दाखवलं आहे! फक्त १४ वर्षांचा असलेला वैभव आयपीएलमध्ये शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तो आता भारताच्या भविष्याचा तारा मानला जातोय. पण हे यश सहज आलेलं नाही. या यशामागे आहेत वर्षानुवर्षांचे कष्ट, त्याग आणि अपार जिद्द.
हेदेखील वाचा: Amazing: हसणाऱ्या मूर्तींचं गूढ जग…! मूर्तींच्या हसवणाऱ्या 14 पोज पाहून व्हाल थक्क !
जमिनीवरून ‘पिच’कडे प्रवास:
वैभवचा जन्म बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात झाला. वडील संजीव सूर्यवंशी यांचं संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून होतं. मुलाने क्रिकेट खेळावे, हे कोणाच्याच मनात नव्हतं. पण वैभवच्या मनात मात्र वेगळं काही सुरू होतं. त्याला फक्त बॅट आणि बॉल हवाच असायचा.
घरात पैसे नव्हते, साधे बूटही घेणे शक्य नव्हते. पण त्याचे वडील म्हणाले, “मुलाचं स्वप्न अपुरं राहू द्यायचं नाही.” त्यांनी स्वतःची शेती विकली. नातेवाइकांनी विरोध केला, गावात लोक हसले. पण संजीव सूर्यवंशी डगमगले नाहीत. त्यांनी मुलासाठी सर्व काही पणाला लावलं.
दररोज ६०० चेंडू – कठोर प्रशिक्षणाची गोष्ट:
वैभवचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी आठ वर्षांच्या वैभवला पहिल्यांदा नेटमध्ये पाहिलं आणि लगेच ओळखलं – हा मुलगा काहीतरी मोठं करेल. मग काय, सुरू झाला कठीण सराव. दररोज ६०० चेंडूंवर फलंदाजीचा सराव. सुट्टी नाही, कंटाळा नाही, फक्त सराव.
“जेव्हा इतर मुलं होमवर्क करत होती, तेव्हा वैभव बॉलला सीधा सिक्सर मारायचा सराव करत होता,” असे कोच ओझा सांगतात.
आयपीएलमधील अविस्मरणीय पदार्पण:
२०२५ साली वैभवने राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरसारख्या अनुभवी गोलंदाजाला षटकार मारला! पुढे त्याने अफगाणिस्तानच्या दिग्गज फिरकीपटू राशिद खानवर षटकार ठोकून शतक पूर्ण केलं. ही फक्त खेळी नव्हती – ही होती भारताच्या क्रिकेट भविष्याची झलक!
कोट्यवधींचा करार आणि जबाबदारी:
मागील वर्षी जेव्हा आयपीएलचा मेगा लिलाव झाला, तेव्हा फक्त १३ वर्षांचा असलेला वैभव १.१ कोटी रुपयांना राजस्थान रॉयल्सने विकत घेतला. क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. हा तोच मुलगा ज्याच्याकडे एकेकाळी बूट विकत घेण्याइतकेही पैसे नव्हते.
भारत अंडर-१९ मध्ये चमक:
चेन्नईमध्ये भारत अंडर-१९ संघाकडून खेळताना वैभवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५८ चेंडूंमध्ये शतक झळकावलं. हे केवळ आकडे नाहीत – हे त्या मेहनतीचं, त्यागाचं आणि जिद्दीचं प्रतिक आहे.
मुलांनो, हे लक्षात ठेवा…
वैभव सूर्यवंशीची गोष्ट आपल्याला शिकवते की…
* स्वप्नं मोठी असली पाहिजेत.
* त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात.
* अनेकदा अपयश येईल, लोक हसतील, पण खचून जाऊ नका.
* कधीही तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा हात सोडू नका.
आज वैभव नावाचं वादळ भारताच्या गर्वाचं नाव बनलं आहे. उद्या तुम्हीही बनू शकता – जर तुमच्यात चिकाटी, मेहनत आणि स्वप्नं बघायची हिम्मत असेल तर!
– मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली