Amazing: हसणाऱ्या मूर्तींचं गूढ जग…! मूर्तींच्या हसवणाऱ्या 14 पोज पाहून व्हाल थक्क !

हसणाऱ्या मूर्तींचं गूढ जग

मुलांनो, माणूस म्हणून आपल्याला हसवणं आणि हसणं दोन्ही खूप आवडतं. कधी आपल्या बोलण्यातून, कधी खोडकर कृतीतून आपण एकमेकांना हसवतो. पण जर मूर्ती हसवायला लागल्या, तर? आश्चर्य वाटेल ना? अगदी असंच अनुभव तुम्हाला मिळेल कॅनडाच्या व्हॅन्कूव्हर शहरात! तिथल्या इंग्लिश बे बीचवरील मॉर्टन पार्कमध्ये उभ्या असलेल्या “ए-मेज-इंग लाफ्टर” नावाच्या हसऱ्या मूर्ती बघितल्यावर कोणाचंही मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.

 

हसणाऱ्या मूर्तींचं गूढ जग

हसण्याचं मूर्तरूप!
काही गोष्टी स्वतः अनुभवल्याशिवाय खरं वाटत नाहीत – ही त्यापैकीच एक. इंग्लिश बेच्या काठावर उभ्या असलेल्या या भव्य कांस्य मूर्ती इतक्या जिवंत आणि मनमोहक आहेत की, त्यांच्याकडे पाहिलं की चेहऱ्यावर हसू आपसूक उमटतं.

हेदेखील वाचा: ज्ञानमंदिर: जिथे होते पुस्तकाची पूजा /Temple of Knowledge: Where Books Are Worshipped

या कलाकृती चीनमधील प्रसिद्ध शिल्पकार यू मिनजुन यांनी 2009 साली घडवल्या. विशेष म्हणजे या चौदा मूर्तींमध्ये प्रत्येकाचा चेहरा मिनजुन यांच्याच चेहऱ्याशी साधर्म्य राखणारा आहे. प्रत्येक मूर्ती वेगळ्या पद्धतीने आणि अनोख्या पोजमध्ये हसताना दाखवली आहे. डोळे, भुवया, दात, केस – प्रत्येक बारकाव्यावर अचूकतेने काम केलं आहे. त्यामुळे त्या पाहणाऱ्याला असं वाटतं की जणू हसण्याचं मूर्तरूप आपल्यासमोर उभं आहे!

हसणाऱ्या मूर्तींचं गूढ जग

-हसवणाऱ्या मूर्तींचं भूलभुलैयासारखं आकर्षण
या मूर्ती केवळ हसवणाऱ्या नाहीत, तर त्या पाहताना तुमचं मनसुद्धा खेळामध्ये हरवून जातं. प्रत्येक मूर्ती सुमारे 3 मीटर उंच आणि 250 किलो वजनाची आहे. त्यांना गोलाकार रचनेत अशा प्रकारे मांडण्यात आलं आहे की, त्या पाहताना एखाद्या भूलभुलैयामध्ये चालल्याचा भास होतो.

या मूर्तींना कोणताही अडथळा नाही – ना भिंत, ना कुंपण. त्यामुळे पर्यटक त्या मूर्तींमध्ये मुक्तपणे फिरू शकतात, त्यांच्याशी मनसोक्त फोटो काढू शकतात. एका मूर्तीपासून दुसऱ्याच्या दिशेने चालत गेलं की, वाटतं आपण एखाद्या हसऱ्या दुनियेत प्रवेश केला आहे – जिथे हसणं हीच भाषा आहे!

हेदेखील वाचा: pinnacle of beauty: स्वर्गसदृश ऊटी: समुद्रसपाटीपासून सुमारे 7,350 फूट उंचीवर वसलेले शहर; निसर्गरम्य सौंदर्याची अनुभूती

प्रकाशात रंग बदलणाऱ्या स्मितमूर्ती
या मूर्ती मूळतः कांस्य धातूपासून बनवलेल्या असून त्यांचा रंग सोनसळी तपकिरी आहे. मात्र सूर्यप्रकाशाच्या कोनानुसार त्या वेगवेगळ्या छटांमध्ये चमकत राहतात. आणि रात्री जेव्हा स्ट्रीट लाइट्स त्यांच्यावर पडतात, तेव्हा त्या इतक्या सुंदर झळाळून दिसतात की डोळे तिथेच स्थिरावतात. संध्याकाळच्या वेळी समुद्राच्या गाजरे आवाजात, या हसऱ्या मूर्तींच्या सान्निध्यात काही वेळ घालवणं – हा अनुभव शब्दांत मांडणं अशक्यच!

हसणाऱ्या मूर्तींचं गूढ जग

हसण्यामागचं गूढ आणि संदेश
या संपूर्ण शिल्पसमूहाचा मूळ हेतू काय, हे सांगताना शिल्पकार यू मिनजुन म्हणतात, “हसणं हा एक असा क्षण आहे जिथे आपण सर्व चिंता विसरतो. हे केवळ वरवरचं हास्य नसून, अंतर्मनातील अस्वस्थतेवर फुंकर घालणारं औषध आहे.” या कलाकृती सार्वजनिक जागांमध्ये असणं म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावर नकळत हसू फुलवणं. त्यामुळे त्यांचं तणावमुक्त होणं सहज शक्य होतं. इंग्लिश बेवर उभ्या असलेल्या या हसणाऱ्या मूर्ती खरं तर हसणं म्हणजे जीवन जगण्याचं अत्यावश्यक अस्त्र आहे, हेच आपल्याला सतत आठवत राहतात.

मूर्तींच्या हसवणाऱ्या पोज
या चौदा मूर्ती वेगवेगळ्या हसण्याच्या पोझमध्ये आहेत:
* दोन्ही हात डोक्यावर ठेवून, डोळे मिटून जोरात हसताना
* गुडघ्यांवर हात टेकवून, पुढे वाकून हसताना
* एक हात तोंडावर, दुसरा हवेत उचललेला
* हात कमरेवर ठेवून, छाती फुगवून ठसक्याने हसताना
* गालांवर हात ठेवून निरागसपणे हसताना
* पूर्ण अंग मागे झुकवून, मान वर करून हसताना
* एक हात पोट धरून, पेटून हसताना

* दोन्ही हात पसरून, जणू जगाला मिठी देताना
* मान थोडी झुकवून, डोळे टेढे करत मिश्किलपणे हसताना
* कान पकडून, निरागस खोडकरपणाने हसताना
* थोडं झुकून, जमिनीच्या दिशेने पाहत हसताना
* हात हवेत फिरवत, उत्साहाने हसताना
* पूर्ण तोंड उघडून, डोळे मिटून मनापासून हसताना
* भुवया उंचावून, ओठ एकत्र करून मिश्किल हसताना

तर मग, तुम्हालाही एकदा या हसणाऱ्या मूर्तींच्या जगात फेरफटका मारायचा आहे का?

-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *