गोष्ट क्रमांक 15: सिंबाला मिळालं आपलं घर / Simba found his home

सिंबा

गोष्ट परिचय: ही आहे छोट्या सिंबाची कहाणी. रस्त्यावर एकटं पडलेलं एक भेदरलेलं पिल्लू, मायेच्या शोधात भटकत होतं. दु:खातून उठून ते एका चांगल्या माणसाच्या भेटीने नवं आयुष्य गाठतं. मुलीच्या प्रेमळ हाकेला प्रतिसाद देत त्याला मिळतं नवं नाव – सिंबा. ही आहे एका पिल्लाच्या हरवून पुन्हा सापडलेल्या घराची हृदयस्पर्शी गोष्ट.

सिंबा

ते एक गोंडस, कुजबुजत्या डोळ्यांचं लहानसं पिल्लू. अजून नावही ठरलं नव्हतं त्याचं. सकाळपर्यंत आईच्या मायेच्या सानिध्यात, भावंडांच्या संगतीत मातीवर लोळत, शेपट्या ओढत, पायात पाय गुंतवून खेळत होतं ते. पण खेळता खेळता कसं कुठे निघून गेलं, ते त्यालाही कळलं नाही.

तो रस्त्याच्या कडेला आला, तेव्हा एका खोडकर मुलाच्या नजरेत भरला. त्या मुलाने त्याला उचललं आणि मस्ती करत करत पुढे निघाला. वाटेतच पिल्लाच्या नाजूक कानांना खेचलं गेलं. वेदनेने पिल्लू कूं-कूं करत रडू लागलं. कुणीतरी काहीतरी म्हणताच त्या मुलाने त्याला रागाने तिथेच जमिनीवर आपटून दिलं. पिल्लू थरथरत बाजूला सरकलं. आई, भावंडं, खेळती माती — सगळं दूर गेलं होतं. ते भीतीनं थरथरत कोपऱ्यात बसून हुंदका देत राहिलं.

हेदेखील वाचा: गोष्ट क्रमांक 14: खारुताई आणि मांजरीची पिल्लं; this story, because it teaches the true nature of friendship!

तेवढ्यात तिथं एक कार थांबली. त्यातून एक लहानशी मुलगी, आसावरी, आपल्या बाबांसोबत खाली उतरली. त्यांनी जवळच्या दुकानातून थोडं खाण्यापिण्याचं सामान घेतलं आणि परतीचा रस्ता धरला.

सिंबा

पर्स खिशात ठेवताना ती बाबांच्या लक्षात न येता खाली पडली. कोणीच पाहिलं नाही ती गोष्ट. पण त्या पिल्लाने पाहिलं. पिल्लू तिथेच बसलेलं होतं, पण मनात करुणा आणि समजूतदारी होती. त्याने ती पर्स तोंडात धरली आणि धावत जाऊन त्या दोघांच्या समोर उभा राहिला.

बाबांनी आश्चर्याने पर्स घेतली. डोक्यावरून थोपटत प्रेमाने म्हणाले, “तू तर खूपच हुशार आहेस रे! शाब्बास!”
“पप्पा! हा किती गोड आहे! आपण याला आपल्यासोबत घेऊ ना?”
“आसावरी, अगदी मनातलं बोललीस! आता तुला खेळायला एक चांगला मित्र मिळेल. याचं नाव ‘सिंबा’ ठेवूया.”

इतकं म्हणत त्यांनी पिल्लाला उचललं आणि कारमध्ये मऊपणे बसवलं. आसावरीने पिशवी उघडली आणि त्याला ब्रेडचा एक छोटा तुकडा दिला. सिंबा तिच्या मांडीवर बसून ब्रेड खात होता, शेपटी हलवत होता, आणि डोळ्यांत नवे घर मिळाल्याचं समाधान झळकत होतं.
आता त्याचं नाव होतं – सिंबा
आता त्याला मिळालं होतं – नवं घर, नवा दोस्त, आणि भरभरून माया!

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *