सारांश: फुलपाखरे हे रंगीबेरंगी पंख असलेले नाजूक कीटक असून, त्यांचे जीवन अंडे, अळी, कोश आणि प्रौढ अशा चार टप्प्यांतून जाते. महाराष्ट्रात अनेक प्रकारची फुलपाखरे आढळतात, ज्यात वाघ्या, नीलपरी, चित्ता, रेड पियरोट यांसारख्या जातींचा समावेश आहे. फुलपाखरांचे आणि फुलांचे घनिष्ठ नाते असून, त्यांची रंगदृष्टी माणसाच्या रंगदृष्टीपेक्षा भिन्न असते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि जैवविविधता टिकवण्यासाठी फुलपाखरांचे संवर्धन गरजेचे आहे.
फुलपाखरू हा एक नाजूक, रंगीबेरंगी पंख असलेला कीटक आहे. जगभरात जवळपास १७,५०० जातींची फुलपाखरे आढळतात. त्यांच्या रंगीबेरंगी पंखांमुळे आणि हलक्या उडण्याच्या लकबीमुळे ती नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहेत. फुलपाखरांना चार पंख आणि दोन मिशा असतात. ते मिशांच्या साहाय्याने वास ओळखतात, तर त्यांच्या पायांमधून चव जाणवते.
फुलपाखरांचे शरीररचनात्मक वैशिष्ट्ये
फुलपाखराची सोंड डोक्याच्या खालच्या बाजूस असते आणि ती एक प्रकारे घड्याळाच्या स्प्रिंगसारखी वळलेली असते. त्यांच्या पंखांवर अतिसूक्ष्म खवले असतात, जे विशिष्ट रंगद्रव्यांमुळे विविध छटा धारण करतात. काही फुलपाखरांमध्ये ऋतुमानानुसार त्यांच्या रंगांमध्ये बदल घडतो. नर फुलपाखरांमध्ये गंधखवले असतात, जे मादांना आकर्षित करण्याचे काम करतात.
फुलपाखरांचे जीवनचक्र
फुलपाखरांचे जीवन चार टप्प्यांतून जाते:
१. अंडे – मादी विशिष्ट झाडांच्या पानांवर अंडी घालते.
2. अळी (अवस्था) – अंड्यातून बाहेर पडलेल्या अळीला अन्न म्हणून पाने खायला मिळतात. ती सतत वाढत राहते आणि चार वेळा कात टाकते.
3. कोशावस्था – पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी कोशात बदलते, जिथे तिचे रूपांतर प्रौढ फुलपाखरामध्ये होते.
4. प्रौढ फुलपाखरू– कोशातून बाहेर आल्यावर पंख सुकल्यावर ते उडू लागते आणि पुढील पिढीसाठी अंडी घालते.
हे देखील वाचा: गोष्ट क्रमांक 5: गुरुचे श्रेष्ठ स्थान/ Supreme Position of Guru
महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध फुलपाखरांच्या जाती
महाराष्ट्रात अनेक प्रकारची रंगीबेरंगी आणि वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरे आढळतात. या फुलपाखरांना वाघ्या, बिबळ्या कडवा, ढाण्या कडवा, काळू, पानपंखी, शुभ्रपंखी, सोनपंखी, नीलवंत, नखरेल मयुरी, भटके तांडेल, सरदार, चित्ता, छोटा चांदवा, काळा राजा, बहुरूपी, शेंदूर टोक्या, लालटोक्या, स्वैरिणी, अक्कडबाज इत्यादी नावे आहेत.
महाराष्ट्रात आढळणारी प्रसिद्ध फुलपाखरे
महाराष्ट्रात रेड पियरोट, कॉमन टायगर, कॉमन ग्रास यलो आणि प्लेन्स कामदेव, ग्लासी टायगर, कॉमन इव्हिनिंग ब्राउन, टॉनी कॉस्टर, ग्रेट एगफ्लाय, डॅनाइड एगफ्लाय, कॉमन सेलर, चेस्टनट-स्ट्रीक्ड सेलर, कॉमन जे, कॉम आणि कॉमन मॉर्मन आदी प्रकारची फुलपाखरे आढळतात.
फुलपाखरे आणि फुलांचा संबंध
फुलपाखरे प्रामुख्याने फुलांवर अवलंबून असतात. फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी फुलांच्या रंगांत विशेष वैशिष्ट्ये असतात. मात्र, फुलपाखरांची रंगदृष्टी माणसाच्या रंगदृष्टीपेक्षा वेगळी असते. माणसाला दिसणारे रंग ४०० ते ७०० नॅनोमीटर लांबीच्या प्रकाशतरंगांमध्ये असतात, तर फुलपाखरांना ३०० ते ६५० नॅनोमीटर लांबीचे प्रकाशतरंग दिसतात. त्यामुळे फुलपाखरांना काही विशिष्ट रंग आणि नमुने दिसतात, जे माणसाला दिसत नाहीत.
फुलपाखरांचे जग खूप सुंदर आणि वेधक आहे. त्यांच्या जीवनचक्रातील बदल, त्यांचे रंगीत पंख आणि फुलांशी असलेले नाते यामुळे ते निसर्गाच्या अद्भुत रचनांपैकी एक मानले जाते. महाराष्ट्रातही अनेक प्रकारची सुंदर फुलपाखरे आढळतात, जी पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे फुलपाखरांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे