लहान मुलांना मैनांच्या मागे धावायला खूप आवडतं. मैना वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विविध नावांनी ओळखली जाते, पण आपल्या देशात तिला ‘मैना’ या नावानेच ओळखले जाते. संस्कृतमध्ये तिला ‘सारिका’ किंवा ‘शारक’ म्हणतात. पंजाबी भाषेत गुटार किंवा लाडी, तर हरियाणात काबर या नावाने ती ओळखली जाते. मैनेचं वैज्ञानिक नाव आहे – Acridotheres tristis.
मैना मूळतः दक्षिण आशियातील पक्षी आहे. भारतासह पाकिस्तान, दक्षिण चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि श्रीलंका या देशांमध्ये ती आढळते. मात्र, आजकाल जगभरात अनेक ठिकाणी मैनांची संख्या वाढली आहे. याचं कारण म्हणजे शेतीसाठी मैनांचा उपयोग. मैना शेतीला हानी पोहोचवणारे कीटक खात असल्याने, पिकांचे संरक्षण करण्यासाठी ती पाळली जाते.
मैना हा चिमणीपेक्षा मोठा आणि कबुतरापेक्षा लहान असा पक्षी आहे. त्याची लांबी सुमारे २१ ते २३ सेंमी असते. या पक्ष्याच्या शरीराचा मध्यभाग तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या मानेच्या वरचा भाग आणि डोके काळे असते, तसेच शेपटी आणि पंखांच्या खालची बाजूही काळसर असते. त्यामुळे त्याचा पिसारा अर्धा तपकिरी आणि अर्धा काळा दिसतो. शिवाय, त्याच्या पंखांच्या टोकांना सामान्यतः पांढरी किनार असते.
मैना किडे, अळ्या, गांडुळे, तसेच मरण पावलेल्या सरडे आणि पक्ष्यांवरही ताव मारते. ती माणसांच्या वस्तीच्या जवळ राहणारी पक्षी आहे, कारण तिला तिथे सहज अन्न मिळते. नैसर्गिक अन्नाशिवाय माणसाने टाकलेले अन्नही ती खाते, म्हणूनच ती घराच्या अंगणातसुद्धा सहज दिसते.
मैना धाडसी पक्षी आहे. संकट आल्यास ती स्वतःच्या संरक्षणासाठी मोठ्या पक्ष्यांवरसुद्धा हल्ला करते. ती सुंदर आणि आकर्षक दिसते, तसेच तिचा आवाजही खूप गोड असतो. असे मानले जाते की, मैना गोड आवाजात गाते आणि इतर पक्ष्यांचे तसेच माणसाचेही अनुकरण करते.
मात्र, आपल्या घरांजवळ आणि बागांमध्ये दिसणारी ‘कॉमन मैना’ (सामान्य मैना) हे करू शकत नाही. हा गुण ‘हिल मैना’ किंवा ‘पहाडी मैना’ मध्ये असतो. पहाडी मैना पर्वतीय जंगलांमध्ये आढळते.
पहाडी मैना – अनोखी आणि सुरेल:
पहाडी मैना सामान्य मैनेप्रमाणे उड्या मारत चालत नाही. तिची लांबी सुमारे ३० सेंमी असते. तिची चोच आणि पाय नारंगी-पिवळ्या रंगाचे असतात. शरीराच्या वरच्या भागाला हलक्या हिरवट झाक असलेला चमकदार काळा रंग असतो, आणि त्यावर पिवळसर-नारिंगी ठिपके असतात.
जेव्हा ती बसलेली असते, तेव्हा ती पूर्णपणे काळसर दिसते. मात्र, उडताना तिचे पंख पांढऱ्या रंगाचे भासतात. पहाडी मैनाच्या अनेक प्रजाती आहेत. छत्तीसगड राज्याच्या बस्तर जंगलातील पहाडी मैना हा त्या राज्याचा अधिकृत पक्षी आहे. ती दंतेवाडा, बीजापूर, नारायणपूर, कोंडागाव आणि जगदलपूरच्या जंगलांत आढळते. छत्तीसगडच्या या राज्य पक्ष्याचे वैज्ञानिक नाव आहे – Gracula religiosa.
मैना पवित्र पक्षी मानला जातो, आणि तो पाहिल्यावर आनंद होतो. त्याच्या सुरेल गाण्यामुळे अनेक लोक त्याला पिंजऱ्यात ठेवण्याचा मोह करतात, पण ते अयोग्य आहे. कोणत्याही पक्ष्याला कैदेत ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाही.
पक्षी हे जंगलाचे सौंदर्य असतात आणि ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच शोभून दिसतात. म्हणूनच, त्यांचे जंगल आणि नैसर्गिक निवासस्थान वाचवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. हेच जैवविविधता जपण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, कारण ती माणसाच्या अस्तित्वासाठीही अनिवार्य आहे.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली