भारतीय धार्मिक परंपरांमध्ये भगवान गणेश यांना सर्व देवांमध्ये प्रथम पूजनीय स्थान आहे. प्रत्येक मंगलकार्याची सुरुवात “श्रीगणेशा”ने करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा होणारा गणेशोत्सव म्हणजे भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचे प्रतीक. या निमित्ताने देशभरातील गणेश मंदिरे भाविकांनी गजबजून जातात. अनेक मंदिरे केवळ उपासनेची केंद्रे नसून इतिहास, शिल्पकला, वास्तुकला आणि श्रद्धेचे अद्वितीय दर्शन घडवतात. चला तर पाहूया भारतातील काही प्रसिद्ध व भव्य श्रीगणेश मंदिरे—

श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबई (महाराष्ट्र)
मुंबईतील प्रभादेवी येथे उभे असलेले सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक आहे. इ.स. 1801 मध्ये लक्ष्मण विठू आणि देऊबाई यांनी याचे बांधकाम केले. काळ्या दगडावर कोरलेली श्रीगणेश मूर्ती रिद्धी-सिद्धीसह येथे विराजमान आहे.
या मूर्तीची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे बाप्पांची सोंड उजव्या बाजूला वळलेली असून ती थेट पोटाशी जोडलेली आहे. त्यामुळेच त्यांना “सिद्धिविनायक” व “नवसाचा गणपती” असे म्हटले जाते. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून या मंदिराची ख्याती आहे.
आज हे मंदिर पाच मजली असून, लाखो भाविक दररोज येथे दर्शनासाठी येतात. मंदिराच्या आवारात रुग्णालय, प्रवचन मंडप, स्वयंपाकघर आणि गणेश संग्रहालयही आहे.

उच्ची पिल्लैयार मंदिर, तमिळनाडू
तिरुचिरापल्लीच्या रॉकफोर्ट टेकडीवर वसलेले हे मंदिर पल्लव राजांच्या काळात खडक कोरून बांधले गेले. शैलकलेचे अप्रतिम उदाहरण मानले जाणारे हे मंदिर रामायणकाळाशी जोडलेले आहे.
पौराणिक कथेनुसार, भगवान रामांनी विभीषणाला विष्णूची मूर्ती दिली होती. मात्र श्रीगणेशजींनी गवळ्याचे रूप घेऊन त्याला लंकेत मूर्ती नेण्यापासून थांबवले. विभीषणाने रागाच्या भरात वार केला व त्याच्या डोक्यावर कायमचा निशाण पडला. आजही मूर्तीवर ते निशाण दिसते.
हेदेखील वाचा: मिम कुट उत्सव : मिजोरामच्या संस्कृतीचे हृदय/ The Heart of Mizoram’s Culture
या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 417 पायऱ्या चढाव्या लागतात. दररोज सहा वेळा आरत्या होतात व गणेशोत्सवाचा दहा दिवसांचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

कनिपक्कम विनायक मंदिर, आंध्र प्रदेश
चित्तूर जिल्ह्यातील नदीच्या मध्यभागी असलेले हे मंदिर ११व्या शतकात चोल राजा कोलोत्तुंग चोलाने बांधले. १४व्या शतकात विजयनगर साम्राज्याने याचा विस्तार केला.
येथील श्रीगणेश मूर्ती स्वयंभू आहे आणि तिच्या पोट व गुडघ्यांचा आकार सतत वाढत असल्याची चमत्कारिक मान्यता आहे. “पाण्याच्या देवतेचे मंदिर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थळावर ब्रह्मोत्सवम व गणेशोत्सव तब्बल २१ दिवस साजरे होतात.
तिरुपतीपासून अवघ्या ७५ किमी अंतरावर असल्याने लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. पवित्र जलात स्नान केल्याने संकटांचे निवारण होते, असा विश्वास आहे.

बडे गणेशजीचे मंदिर, उज्जैन (मध्यप्रदेश)
महाकालेश्वर मंदिराजवळ असलेले बडे गणेशजीचे मंदिर आपल्या विशाल मूर्तीसाठी जगप्रसिद्ध आहे. पं. नारायणजी व्यास यांनी याची स्थापना केली.
ही मूर्ती अनोख्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे. सिमेंट न वापरता गूळ, मेथीदाणे, वीट, चुना व वाळूचा उपयोग केला गेला. त्यात सर्व पवित्र तीर्थक्षेत्रांचे पाणी आणि मथुरा, द्वारका, अयोध्या, कांची, उज्जैन, काशी व हरिद्वार येथील माती मिसळण्यात आली आहे. त्यामुळे मूर्तीला पवित्रतेचे वर्चस्व लाभले आहे.

रणथंभोर त्रिनेत्र गणेश मंदिर, राजस्थान
सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंभोर किल्ल्याच्या आत वसलेले हे मंदिर दहाव्या शतकात बांधले गेले. येथे गणेशजींना “रणभंवर रणक भंवर” या नावाने ओळखले जाते.
हे जगातील एकमेव असे मंदिर आहे, जिथे गणेश मूर्ती नारिंगी रंगाची असून शिवाप्रमाणे त्रिनेत्र धारण केलेली आहे. याशिवाय येथे गणेशजींचा संपूर्ण परिवार—रिद्धी, सिद्धी व पुत्र शुभ-लाभ—सोबत स्थापित आहे.
पौराणिक कथेनुसार, श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहाचे निमंत्रणपत्र येथे पाठवण्यात आले होते. तेव्हापासून विवाह किंवा मंगलकार्याच्या निमित्ताने स्थानिक लोक सर्वप्रथम गणेशजींना आमंत्रण पाठवतात. गणेशोत्सवाच्या दिवशी येथे भव्य मेळा भरतो.

बाल गणपती मंदिर, गोवा
गोव्याच्या फोंडा येथे असलेले हे मंदिर भगवान गणेशांच्या बालरूपाला अर्पण आहे. लहान मुलाच्या स्वरूपातील पूजा येथे केली जाते.
मंदिराचे वातावरण शांत, भक्तिमय असून पारंपरिक व आधुनिक वास्तुकलेचा सुंदर संगम येथे दिसतो. मोठ्या संख्येने श्रद्धाळू व पर्यटक येथे येतात. मान्यता आहे की, दर्शनाने संकटे दूर होतात व मनोकामना पूर्ण होतात.
गणेशोत्सवावेळी विशेष पूजा, भजन-कीर्तन व शोभायात्रेचे आयोजन केले जाते.
भारतभर पसरलेली ही गणेश मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नाहीत, तर ती आपल्या इतिहास, संस्कृती आणि परंपरांचे जतन करणारी केंद्रे आहेत. प्रत्येक मंदिराची वास्तुशैली, पौराणिक कथा आणि धार्मिक मान्यता भाविकांना एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव देते.
गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि संकटमोचक मानले जातात. त्यामुळेच भक्त दरवर्षी या मंदिरांमध्ये गर्दी करतात आणि आपल्या जीवनातील प्रत्येक कार्याची सुरुवात त्यांच्या चरणी वंदन करूनच करतात.
🙏 गणपती बाप्पा मोरया!
