तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध लोकमहोत्सव बथुकम्मा हा स्त्री-सन्मान आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक मानला जातो. भाद्रपद अमावास्येपासून सुरू होऊन दुर्गाष्टमीपर्यंत सलग नऊ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात कला, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो.
भारत हा सण-उत्सवांचा देश. वर्षभर कुठे ना कुठे उत्साहाचा जल्लोष असतो. विविध जाती-धर्म, प्रदेशातील लोक आपापल्या पद्धतीने सण साजरे करतात. मात्र प्रत्येक राज्यात काही असे खास पारंपरिक उत्सव असतात, जे त्या भूमीच्या संस्कृतीशी, श्रद्धेशी आणि जीवनशैलीशी घट्ट विणलेले असतात. तेलंगणा राज्यातील ‘बथुकम्मा’ हा असाच एक लोकमहोत्सव, जो स्त्री-सन्मान, मातृशक्ती आणि निसर्गप्रेम यांचे सुंदर प्रतीक मानला जातो.

वातावरणात दरवळतात सुरेल लहरी :
छिन्निमा बथुकम्मा, छिन्नारक्का बथुकम्मा, दादीमां बथुकम्मा, दामेरमुतक्कल बथुकम्मा…
अशा गीतांच्या मधुर स्वरलहरी जेव्हा वातावरणात घुमू लागतात, तेव्हाच लक्षात येते की बथुकम्मा पर्व अवतरले आहे आणि संपूर्ण तेलंगणामध्ये मातृशक्तीप्रति आदरभाव व निसर्गप्रेमाचा उत्सव उसळून वाहू लागला आहे.
या पर्वात एक प्रतीकात्मक पुष्पमूर्ती तयार केली जाते. त्यासाठी विविध रंगांच्या फुलांचा वापर होतो. म्हणूनच या सणाला रंगांचा उत्सव असेही म्हटले जाते. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात संपूर्ण तेलंगणामध्ये फुलांनी विविध आकर्षक आकृती घडविल्या जातात. यातील बहुतेक फुले आयुर्वेदिक दृष्ट्याही उपयुक्त असतात.
या फुलांची सात थरांची रचना करून मंदिराच्या गोपुरमासारखी आकृती साकारली जाते. तेलुगू भाषेत ‘बथुकम्मा’चा अर्थ होतो – देवी माता जिवंत आहे. या दिवशी बथुकम्माची महागौरीच्या रूपात पूजा केली जाते. हा उत्सव स्त्रियांच्या सन्मानाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
कधी साजरा केला जातो :
हिंदू पंचांगानुसार हा उत्सव श्राद्ध पक्षातील भाद्रपद अमावास्या, जी महालय अमावास्या म्हणूनही ओळखली जाते, त्या दिवशी सुरू होतो आणि नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी संपतो. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार हा सण सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव २१ ते ३० सप्टेंबर दरम्यान होणार आहे. हा उत्सव पावसाळ्याच्या शेवटी सुरू होऊन शिशिर ऋतूच्या प्रारंभीपर्यंत चालतो.

पर्व कसा साजरा करतात :
या सणात फुलांनी मोठ्या डोंगरासारखी रचना केली जाते. त्याच्या सर्वात वरच्या भागात हळदीपासून बनविलेली गौरम्मा ठेवली जाते. या काळात नृत्य-गायनाचे कार्यक्रम होतात. बथुकम्मा हे नाव प्रत्यक्षात बृहदाम्मा या नावावरून आलेले मानले जाते. असा समज आहे की भगवान शिव-पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी हा उत्सव मागील हजार वर्षांपासून हाच परिसर (सध्याचा तेलंगणा) येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात :
पावसाळ्यात सर्वत्र पाण्याचा प्रवाह सुरू होतो. नद्या, तलाव आणि विहिरी पाण्याने भरून जातात. त्यानंतर पृथ्वीवर फुलांच्या रूपाने पर्यावरणात नवचैतन्य फुलते. याच कारणामुळे निसर्गाचे आभार मानण्यासाठी विविध फुलांच्या सजावटीसह हा उत्सव साजरा केला जातो. या सणानिमित्त नवविवाहित महिलाही आपल्या माहेरी येतात. असे मानले जाते की त्यांच्या जीवनात नवा उत्साह आणि परिवर्तन आणण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली होती.

उत्सवाच्या सुरुवातीच्या पाच दिवसांत स्त्रिया आपल्या घरचे अंगण स्वच्छ करून त्याला शेणाने सारवतात. सकाळी लवकर उठून त्या अंगणात सुंदर-सुंदर मुग्गू काढतात. अनेक ठिकाणी ऐप्पनने चौकटी आखल्या जातात, त्यात नाजूक कलाकृती रेखाटल्या जातात. तांदुळाच्या पिठापासून तयार होणाऱ्या रांगोळीचेही या उत्सवात विशेष महत्त्व आहे. घरातील पुरुष बाहेरून नानाविध फुले आणतात – त्यात सलोसिया, सेन्ना, झेंडू, कमळ, ककुर्बिता, कुकुमिस आणि इतर अनेक फुलांचा समावेश असतो. फुलांच्या थरांवर फुलांच्या पानांनी सजावट केली जाते. या रचनेला थंबलम असे म्हणतात.
सलग नऊ दिवस दर संध्याकाळी स्त्रिया व मुली एकत्र येऊन नाचतात, गातात, ढोल-ताशांचा गजर होतो. प्रत्येकजण आपापली बथुकम्मा घेऊन येते. या वेळी स्त्रिया पारंपरिक साडी आणि दागिने घालतात, तर मुली लहंगा-चोळी परिधान करतात. सर्व स्त्रिया बथुकम्माच्या भोवती वर्तुळ करून स्थानिक भाषेत गाणी गातात. स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धी व कल्याणासाठी माता पार्वतीची प्रार्थना करतात. अष्टमीच्या पूजेनंतर बथुकम्माचे तलावाच्या पाण्यात विसर्जन केले जाते.
-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली
