दौलताबाद किल्ला : इतिहासाचा भक्कम अभिमान; 12 व्या शतकात यादव राजवंशातील भिल्लम पाचवा या पराक्रमी राजाने उभारला किल्ला

दौलताबाद

सारांश: दौलताबाद किल्ला, पूर्वीचा देवगिरी, हा यादव राजाच्या भिल्लम पाचव्याने बाराव्या शतकात बांधलेला एक अभेद्य आणि भव्य किल्ला आहे. मुहम्मद बिन तुघलकाने आपली राजधानीही येथे हलवली होती. स्थापत्यकला, युद्धनीती आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या किल्ल्यात चांदमिनार, मेंढा तोफ, हेमाडपंथी मंदिर व हत्ती हौद यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहेत. आजही हा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासाचे तेजस्वी प्रतीक आणि पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरतो.

दौलताबाद

गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली शौर्यगाथेची झाडं आहेत. त्यांपैकी एक अभेद्य आणि गौरवशाली वास्तू म्हणजे दौलताबादचा किल्ला, ज्याला पूर्वी देवगिरी या नावाने ओळखले जायचे.

संभाजीनगरपासून अवघ्या सोळा किलोमीटरवर उभा असलेला हा भव्य गड म्हणजे युद्धनीती, स्थापत्यकला आणि दूरदृष्टी यांचं एक अपूर्व उदाहरण होय. दगडांच्या भिंतींमध्ये इतिहासाची झलक आणि पराक्रमाचा आवाज अजूनही जपून ठेवलेला आहे.
बाराव्या शतकात यादव राजवंशातील भिल्लम पाचवा या पराक्रमी राजाने हा किल्ला उभारला. मजबूत तटबंदी, व्यापारी मार्गांवरील नियंत्रण, आणि युद्धात उपयोगी ठरणारी रचना यामुळे देवगिरी राजधानी बनली.

हेदेखील वाचा: गोष्ट क्रमांक 15: सिंबाला मिळालं आपलं घर / Simba found his home

पण इतिहासाचं चक्र सतत फिरत असतं—१३२७ मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद बिन तुघलक याने एक अनोखा आणि धाडसी निर्णय घेतला: त्याने आपली संपूर्ण राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली!
पुढे हा किल्ला बहमनी, निजामशाही, मुघल आणि मराठ्यांच्या ताब्यात गेला. प्रत्येक सत्ताधीशाने त्यात भर घालून तो अधिक भक्कम व भव्य केला. त्यामुळे दौलताबाद म्हणजे केवळ गड नव्हे, तर तो सत्तांतराच्या लाटांवर उभा असलेला अचल दीपस्तंभ आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डावीकडे दिसतो तो चांदमिनार — इस्लामिक स्थापत्यशैलीचा २१० फूट उंच मनोरा. किल्ल्यात एका बाजूस ‘किल्ले शिकन’ नावाची एक विशाल पंचधातूंची तोफ ठेवलेली आहे, जिला लोक प्रेमाने ‘मेंढा तोफ’ म्हणतात. या तोफेचं नावच तिच्या ताकदीचं गमक सांगून जातं.

किल्ल्याच्या हृदयात वसलेलं आहे १८० स्तंभांचं हेमाडपंथी मंदिर, जिथे स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये लोकांनी स्वतःहून भारतमातेची मूर्ती स्थापली. या मंदिरासमोर आहे एक ‘हत्ती हौद’ नावाचा प्रचंड जलाशय — १५० फूट लांब, १०० फूट रुंद आणि २३ फूट खोल. हा जलाशय म्हणजे तत्कालीन स्थापत्य आणि जलसंधारण यांचं देखणं उदाहरण आहे.

किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर पोहोचलात, की समोर उलगडतं निसर्गाचं अपूर्व रूप, आणि मागे उरतो इतिहासाचा ठसा — असा अनुभव देणारा हा किल्ला महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी एक मानला जातो.

आजच्या काळातसुद्धा दौलताबाद किल्ला पर्यटक, इतिहासप्रेमी आणि साहसशौकिनांसाठी एक अनमोल खजिना ठरतो. तो रेल्वे, रस्ता आणि हवाई मार्गाने सहज पोहोचण्याजोगा आहे. संभाजीनगरपासून खासगी कॅब, एसटी बस किंवा ऑटोने जाता येतं. आणखी वेळ असेल, तर —वेरूळ लेण्या,घृष्णेश्वर मंदिर, बीबी का मकबरा, पाणचक्की, औरंगाबाद आणि अजिंठा लेणी किल्ल्याजवळची काही खास ठिकाणं जरूर पहा.

चिमुकल्या वाचकांनो, दौलताबाद हा केवळ एक किल्ला नाही, तर तो मातीशी जोडलेल्या इतिहासाची आठवण, शौर्याची साक्ष, आणि भव्यतेचं स्मरण आहे. एकदा तरी या किल्ल्यावर जरूर जा… आणि त्या दगडांशी कान लावून ऐका — तुम्हाला शतकानुशतकांची गोष्ट सांगणारे आवाज नक्की ऐकू येतील!

मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *