मानवी संस्कृतीच्या व्यापक पटावर काही गोष्टी अशा असतात, ज्या केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या संपूर्ण जगाच्या सांस्कृतिक भानावर आपली छाप उमटवतात. अमेरिकेने आपल्या राजकीय व आर्थिक सामर्थ्याबरोबरच सांस्कृतिक वर्चस्वही मिळवले. हीच संस्कृती, चित्रपट, संगीत आणि कार्टूनसारख्या माध्यमांतून जगभर पसरत गेली. या सांस्कृतिक विस्ताराचा एक अत्यंत लक्षणीय व मजेशीर चेहरा म्हणजे – डोनाल्ड डक!
डोनाल्ड डक – एका बदकाचे जागतिक यश
१९३० च्या दशकात वॉल्ट डिस्ने या कल्पनाशील प्रतिभेच्या धनी कलाकाराने, डिक ह्यूमर यांच्या सहकार्याने एक भन्नाट पात्र जन्माला घातले – एक पांढरट रंगाचे, विचित्र पण गोड आवाजात बोलणारे, चपळ हालचाली करणारे बदक. त्याचे नाव होते डोनाल्ड फॉन्टलरॉय डक!
ही केवळ एका कार्टून पात्राची निर्मिती नव्हती, तर हे एका संपूर्ण संस्कृतीचे प्रतीक ठरले. डोनाल्डची अस्सल ओळख म्हणजे त्याचा ‘क्वॅक क्वॅक’ आवाज. प्रारंभी हा आवाज दिला होता क्लेरेंस नॅश यांनी, तर नंतर तो टोनी एसेल्मो यांच्याकडे गेला. आजही डोनाल्डचा आवाज ऐकला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य उमटते.
वेशभूषेतील मजा आणि हास्याचा झरा
डोनाल्ड डकची वेगळी ओळख म्हणजे त्याचे पोशाख. नेव्ही ब्लू रंगाची जॅकेट, लाल बो-टाय आणि टोपी — एकदम नाविकासारखा अवतार! पण त्याला पॅंट नसल्याने तो अधिकच हास्यजनक वाटतो. त्याच्या चालण्याची ठुमकत लय आणि लटपट हालचाली पाहून प्रेक्षकांच्या हसण्याचा रडका फुटतो. डोनाल्डचा चेहरा कायमच क्रियाशील — कधी चिडचिडा, कधी गोंधळलेला, तर कधी अभावितपणे धाडसी!
कार्टूनचा राजा, पण ‘काहीतरी’ नेहमीच चुकतं…
इतर अनेक पात्रांप्रमाणेच डोनाल्डचीही नियती म्हणजे “आले होते हरिभजनाला, लागले कपास ओटायला!” म्हणजेच त्याने जे करायचं ठरवलं ते क्वचितच घडतं, आणि त्याऐवजी हास्यपूर्ण अपघात घडतात. डोनाल्डच्या आयुष्यात कायम गोंधळ करणारे असतात त्याच्या बहिणीचे तीन खोडकर मुलं — ह्युई, ड्युई आणि लुई. हे तिघंही नेहमी त्याला वेडं करून सोडतात.
त्याचबरोबर त्याचा श्रीमंत, पण फारच कंजूष काका स्क्रूज मॅकडकही त्याच्या जीवनात नेहमीच खवखवीत अडथळा बनून उभा असतो. डोनाल्डची प्रियसी डेजी डक मात्र या साऱ्या गोंधळात शांततेचा श्वास आहे — नाजूक, सौम्य आणि संयमित. त्याचे सोबती म्हणजे मिकी माऊस, गूफी आणि प्लूटो — हेही डोनाल्डच्या अफलातून कारनाम्यांमध्ये हजर असतात.
डकबर्ग — कल्पनेतील जीवंत शहर
या सर्व पात्रांचे अधिवास म्हणजे डकबर्ग. हे एक काल्पनिक शहर असले तरी, इतक्या आकर्षकपणे साकारले गेले आहे की ते खरोखरच अस्तित्वात आहे असे वाटते. डकबर्गचे शीर्षकगीतच त्याच्या रोमहर्षक जीवनशैलीचा परिचय करून देते —
“जिंदगी तूफानी आहे… जिथे आहे डकबर्ग!
गाड्या, लेझर्स, विमानं – हेच आहे डकबर्ग!
गूढ शोधा, इतिहास घडवा…
धोक्यांतून वाट काढा!”
डकबर्गमधील हे सारे लोक म्हणजे धाडसी खेळाडू. रोज काही ना काही साहसी, विचित्र, धोकादायक गोष्टी करत राहतात आणि त्यातून उभ्या राहतात नवनव्या रोमांचक कथा.
शत्रूही रंगतदार…
डोनाल्डचे शत्रूही काही साधेसुधे नाहीत! पेटे, चिप आणि डेल हे कायम त्याच्या कामांमध्ये विघ्न आणत असतात. पण डोनाल्डही हार मानणाऱ्यातला नाही. हास्य, संताप आणि धाडस यांचा एक अफलातून संगम म्हणजे डोनाल्ड डक!
कार्टून ते ऑस्कर पर्यंतचा प्रवास
डोनाल्ड डक केवळ बालमनापुरता मर्यादित राहिला नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेच्या नाझीविरोधी प्रोपोगंडामध्ये देखील त्याचा वापर झाला. १९४३ मध्ये ‘द फ्यूरर’स फेस’ ही लघुपट प्रदर्शित झाली आणि तिने ऑस्कर पुरस्कार देखील पटकावला!
डोनाल्ड डक ही एक संकल्पना नाही, तर एक जिवंत भावना आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांना आनंद देणारा, चुका करून शिकवणारा, जीवनाच्या प्रत्येक क्षणी ‘हसण्याचा मार्ग’ शोधणारा हा बदक आपल्या जीवनात नेहमीच ताजेपणा घेऊन येतो. म्हणूनच म्हणावसं वाटतं — “जिंदगी तूफानी आहे… जिथे आहे डोनाल्ड डक!”
–मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली