सारांश: केरळमधील प्रपोयिल येथे उभारलेले नवापुरम मथाथीथा देवालयम हे एक अनोखे ज्ञानमंदिर आहे, जिथे पारंपरिक मूर्तीऐवजी पुस्तकरूपी देवतेची पूजा केली जाते. येथे जात-पात, धर्मभेद नाही; पुस्तक अर्पण करणे हीच भक्ती आणि पुस्तकेच प्रसाद दिले जातात. लेखकांसाठी निवासव्यवस्था, ग्रंथालय आणि वार्षिक सांस्कृतिक महोत्सव यामुळे हे मंदिर ज्ञानाचा प्रसार करणारे केंद्र ठरले आहे. प्रपोयिल नारायण यांच्या ३५ वर्षांच्या अथक प्रयत्नांतून हे मंदिर साकार झाले असून, ते संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे.
केरळच्या हिरवाईने नटलेल्या प्रपोयिल या लहानशा गावात एक अनोखे मंदिर उभे आहे—नवापुरम मथाथीथा देवालयम. हे केवळ देवालय नाही, तर ज्ञानमंदिर आहे. पारंपरिक मूर्तीऐवजी येथे एक भव्य पुस्तकरूपी प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे, जी ज्ञानाचे प्रतीक म्हणून पूजली जाते.
हेदेखील वाचा: गोष्ट क्रमांक 13: गणिताचे ज्ञान / Knowledge of Mathematics
अनुकरणीय संकल्पना
या मंदिरात कोणताही पुजारी नाही, ना कोणतीही दानपेटी (हुंडी). येथे कोणत्याही धर्माचा किंवा जातीय भेदभाव केला जात नाही. ज्ञानाला कोणत्याही सीमा नसतात—याच विचारावर उभ्या असलेल्या या मंदिरात भक्तगण देवतेला पुस्तक अर्पण करू शकतात आणि प्रसाद म्हणून पुस्तकेच मिळतात.
पुस्तकरूपी मूर्ती: ज्ञानाचा स्तंभ
या मंदिराचा केंद्रबिंदू म्हणजे एक ३० फूट उंच पुस्तक, जे नैसर्गिक खडकावर स्थापित करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या पानांवर कोरलेले तीन विचार प्रत्येकाला अंतर्मुख करतात— 1. “ईश्वर म्हणजे ज्ञान” 2. “धर्म म्हणजे व्यापक विचार” 3. “विनम्र बुद्धिमत्ता हाच मार्ग” मंदिराच्या प्रांगणातच उत्तर मालाबारमधील महान कवी चेरुसेरी यांची प्रतिमा आहे. त्यांच्या रचनांनी संपूर्ण दक्षिण भारतात ज्ञानाचा प्रकाश पसरवला.
लेखकांसाठी विशेष निवासव्यवस्था
या मंदिराच्या परिसरात एक विस्तीर्ण ग्रंथालय आहे, जिथे हजारो पुस्तके संग्रहीत आहेत. विशेष म्हणजे, येथे लेखकांसाठी ‘एजुथुपुरा’ नावाच्या झोपड्या उभारण्यात आल्या आहेत, जिथे ते शांततेत राहून लेखन करू शकतात.
एका जिद्दी माणसाचे स्वप्न
या मंदिराच्या निर्मितीमागे आहे प्रपोयिल नारायण यांची ३५ वर्षांची जिद्द आणि श्रद्धा. बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या नारायण यांनी कुटुंबाची जबाबदारी उचलत लहान वयातच संघर्षाला सामोरे गेले. ते २६ हून अधिक पुस्तके लिहिणारे प्रसिद्ध साहित्यिक आहेत आणि पाच विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी स्वतःचे महाविद्यालय सुरू करून त्याच्या उत्पन्नातून हे मंदिर उभारले.
वार्षिक सांस्कृतिक महोत्सव
या मंदिरात दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे सांस्कृतिक सोहळे आयोजित केले जातात. यामध्ये साहित्य संमेलन, लोकनृत्य, नाटके, पुस्तक प्रकाशन समारंभ आणि चार द्रविडी भाषांतील श्रेष्ठ साहित्यिकांचा गौरव केला जातो.
ज्ञानमंदिराचा संदेश
धर्म आणि जातीच्या नावावर समाजात वाढणारे अंतर कमी करून या मंदिराने प्रेम, एकता आणि ज्ञानाचा संदेश दिला आहे. हे केवळ देवालय नाही, तर विचारांचा जागर करणारे पवित्र स्थळ आहे. हा प्रकल्प म्हणजे केवळ एका मंदिराची निर्मिती नाही, तर ज्ञान, सहिष्णुता आणि विवेकबुद्धी यांचा सेतू उभारण्याचा प्रयत्न आहे. प्रपोयिल नारायण यांचे हे कार्य संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि.सांगली