या गोष्टीत काय आहे? मंदिराबाहेर सुभाषला आपली चप्पल सापडली नाही. त्याने दुसऱ्या कोणाची तरी चप्पल घालून जाण्याचा विचार केला. पण त्याचा मित्र आलोकने त्याला थांबवले आणि समजावले की असे करणे म्हणजे चोरी होय. मग सुभाषने काय केले? त्याला त्याची हरवलेली चप्पल मिळाली का? वाचा गोष्ट…
सुभाष आणि त्याचा मित्र आलोक मंदिरात देवदर्शन करून बाहेर आले. पायऱ्यांजवळ सुभाषची चप्पल गायब होती. मात्र, तिथेच त्याच डिझाइनची आणि त्याच आकाराची दुसरी चप्पल होती, फक्त तिचा रंग वेगळा होता. हे पाहून सुभाष चिडून म्हणाला, “कुणीतरी माझी चप्पल चोरली की काय!”
त्याचे बोलणे ऐकताच आलोक म्हणाला, “मी आधीच सांगितले होते ना, चप्पल -स्टँडवर चप्पल ठेवायची! मी ठेवली होती, पण तू दोन रुपये वाचवण्याच्या नादात ऐकले नाहीस.”
हे देखील वाचा: गोष्ट क्रमांक 8: आरोग्य हाच खरा आनंद / Health is the true happiness
“तुला कायम माझी टिंगलच करायची असते. हे बरोबर नाही.” सुभाष त्रासिक स्वरात म्हणाला.
“असं नाही, मी नेहमी तुझ्या भल्यासाठीच बोलतो.” आलोक म्हणाला.
सुभाषने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाला, “जाऊ दे! ही चप्पल घालून जातो आता.”
आलोकने त्याला रोखले, “असे करू नकोस. थोडा वेळ थांबूया. कदाचित कोणी घाईघाईत तुझी चप्पल घालून गेला असेल आणि ती बदलण्यासाठी परत येईल.”
“आलोक, तुला नेहमी माझ्या प्रत्येक गोष्टीत अडथळा आणायचा असतो. माझे म्हणणे कधीही तुला पटत नाही. तू खरंच माझा मित्र आहेस की शत्रू?” सुभाष चिडून म्हणाला.
आलोकने त्याला पुन्हा समजावले, “मी तुझा मित्र आहे, शुभचिंतक आहे, म्हणूनच तुला चुकीच्या गोष्टीपासून रोखतो. समज, तुझी चप्पल चोरीला गेलीच. पण त्याच्या बदल्यात दुसऱ्याची चप्पल घालून जाणे म्हणजे चोरीच होईल.”
हे ऐकून सुभाष गप्प झाला. मग तो थोडा वेळ चप्पल नेणाऱ्याची वाट पाहू लागला. काही वेळाने एक तरुण झपाझप पावले टाकत मंदिराच्या दिशेने येताना दिसला. त्याने सुभाषची चप्पल घातली होती! त्याला आपल्या चप्पलांची अदलाबदल झाल्याचे लक्षात आले. त्याने लगेच सुभाषची चप्पल तिथे ठेवली आणि स्वतःची चप्पल घालून निघून गेला.
आलोकने हसत सुभाषकडे पाहिले. सुभाषच्या चेहऱ्यावर लाजिरवाणे भाव उमटले होते!
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली