सारांश: “आरोग्य हाच खरा आनंद” या कथेतून आरोग्याचे महत्त्व प्रभावीपणे पटवले आहे. एका श्रीमंत सेठने आपल्या मुलासाठी अशी सुज्ञ वधू शोधायचे ठरवले, जिला प्रत्येक समस्येचे उत्तर सापडेल. त्याने अनेक मुलींना त्यांच्या आवडत्या ऋतूबद्दल विचारले, परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर एका मुलीने उत्तर दिले की “जर शरीर आणि मन निरोगी असेल, तर प्रत्येक ऋतू आनंददायी वाटतो”, आणि हे उत्तर ऐकून सेठ प्रभावित झाला. या कथेतून आरोग्यच खऱ्या आनंदाची खरी गुरुकिल्ली आहे हा जीवनसत्त्वाचा संदेश मिळतो.
एका श्रीमंत सेठने ठरवले की आपल्या मुलासाठी अशी सुज्ञ वधू शोधायची, जिला प्रत्येक समस्येचे समाधान सापडेल. तो जिथे जिथे वधूसाठी मुली पाहायला जाई, तिथे तो एकच प्रश्न विचारायचा –
“सर्व ऋतूंमध्ये तुम्हाला कोणता ऋतू सर्वात जास्त आवडतो?”
हे देखील वाचा: गोष्ट क्रमांक 6: अधिकार्याची लबाडी (गोष्टीत हत्तीची एंट्री )/The Official’s Lie
एका मुलीने हसत उत्तर दिले, “मला उन्हाळा खूप आवडतो! या ऋतूत आम्ही डोंगरावर फिरायला जातो. सकाळी लवकर फेरफटका मारण्यात वेगळाच आनंद असतो.”
दुसरी मुलगी म्हणाली, “माझ्यासाठी हिवाळाच सर्वोत्तम! या दिवसांत चविष्ट पदार्थ तयार होतात. गरमागरम खाण्याचा आणि उबदार कपडे घालण्याचा आनंद काही औरच!”
तिसरी मुलगी म्हणाली, “पावसाळा तर मला सर्वात प्रिय! पृथ्वी हिरवाईने नटलेली असते, मातीचा सुगंध मन मोहून टाकतो. आकाशात उमटलेलं इंद्रधनुष्य पाहताना मन प्रसन्न होतं, आणि पावसात भिजण्याची तर काय वेगळीच मौज असते!”
सेठने मुलींची उत्तरे ऐकली. ती चांगली वाटली, पण त्याच्या मनासारखे समाधान काही मिळाले नाही. तो थोडा निराश झाला आणि वधू शोधण्याचे कामच थांबवले.
एके दिवशी, एका नातेवाइकाच्या घरी त्याची भेट एका मुलीशी झाली. सहज गप्पा चालू असताना त्याने तिलाही तोच प्रश्न विचारला.
ती शांतपणे हसली आणि म्हणाली, “सेठजी, जर आपले मन आणि शरीर निरोगी असेल, तर प्रत्येक ऋतू सुंदरच! पण जर आरोग्य बिघडले असेल, तर कुठलाच ऋतू सुखद वाटत नाही.”
सेठ तिच्या हुशारीने भारावून गेला. त्याने तिच्याशीच आपल्या मुलाचा विवाह ठरवला.
काय घ्यावा बोध?
आरोग्य चांगले असेल, तरच जीवनाचा खरा आनंद उपभोगता येतो. म्हणूनच, मन, मेंदू आणि शरीर सदैव निरोगी ठेवा!
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली