सारांश: एका राज्यातील राजकुमारीने स्वयंवरासाठी अट ठेवली होती की जो पाण्यावर चालेल, त्याच्याशी ती लग्न करेल. अनेक राजकुमार भीती आणि शंकेने ग्रस्त होऊन हे आव्हान स्वीकारण्यास तयार नव्हते. मात्र, एका साध्या तरुणाने हुशारीने नदीच्या पाण्याचा वापर करून किनाऱ्यावर पाणी साठवले आणि त्यावर चालून दाखवले. राजकुमारीने त्याच्या धैर्य आणि चातुर्याचे कौतुक करून त्याला वर म्हणून निवडले.
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका राज्यात राजकुमारीच्या स्वयंवराचे आयोजन करण्यात आले होते. विविध राज्यांतील राजकुमार आणि अन्य इच्छुक तरुण त्यात सहभागी झाले. राजकुमारीने अशी अट ठेवली की जो कोणी पाण्यावर चालेल, त्याच्याशी ती लग्न करेल.
हे देखील वाचा: गोष्ट क्रमांक 2: वृद्धाचा यशाचा मूलमंत्र / Old Man’s Success Mantra
राजकुमारीच्या इच्छेनुसार एका नदीच्या काठी मोठे व्यासपीठ उभारण्यात आले. संपूर्ण साम्राज्याची जनता तेथे जमली. हे सर्व पाहून एक राजकुमार म्हणाला, “अरे, पाण्यावर कसं चालता येईल?” दुसरा म्हणाला, “पाण्यावर चाललो तर बुडून जाऊ.” तिसऱ्याने विचार मांडला, “मी प्रयत्न केला आणि अयशस्वी झालो तर राजकुमारी विचार करेल की लालसेपोटी हा बिचारा बुडून मरण्यासही तयार झाला.”
अशा प्रकारे सगळ्या उपस्थित राजकुमारांनी हिम्मत सोडून दिली. तेव्हा एक तरुण, जो दिसायला अगदी सामान्य वाटत होता, त्याने धाडस दाखवले. त्याने स्वयंवरातील अटीप्रमाणे पाण्यावर चालण्याचे आव्हान स्वीकारले. त्याने एक रिकामी बादली मागितली. लगेचच त्याला ती देण्यात आली.
त्याने त्या बादलीने नदीचे पाणी भरून किनाऱ्यावर ओतण्यास सुरुवात केली. जमलेल्या लोकांनी कुचेष्टेने हसत विचारले, “काय, नदीतील पाणी कमी करून त्यावर चालणार का?” पण त्याने कुणाच्याही टीकेकडे लक्ष दिले नाही. त्याने खूप पाणी किनाऱ्यावर ओतले. जेव्हा जमिनीवर पाणी साठलयाचे दिसू लागले, तेव्हा तो त्या पाण्यावर चालू लागला. हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले.
राजकुमारी उठली, त्या तरुणाला वर म्हणून निवडले आणि म्हणाली, “मला बुद्धिमान पती हवा होता. माझी अट पाण्यावर चालण्याची होती, नदीवर नव्हे. शंका आणि भीतीने ग्रस्त होऊन काहीच साध्य होत नाही. नेहमीच हुशारी दाखवली पाहिजे.”
सर्वांनी राजकुमारीच्या निर्णयाचे कौतुक केले. (The young man accepted the challenge)
बोध: शंका आणि भीती यांवर मात करून हुशारी आणि धाडसाने समस्या सोडवता येतात. प्रतिकूल परिस्थितीत कल्पकता दाखवणाऱ्यालाच यश मिळते.