एकदा सिकंदरियाचा राजा टॉलमी याला गणित शिकण्याची तीव्र इच्छा झाली. गणित शिकण्यासाठी त्याने योग्य गुरु शोधण्यास सुरुवात केली. त्याला समजले की यूक्लिड हे महान गणितज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडूनच गणित शिकायचे ठरवले.
राजाने यूक्लिड यांना राजदरबारात बोलावले आणि त्यांना गणित शिकवण्याची विनंती केली. यूक्लिड यांनी आनंदाने हे स्वीकृत केले आणि दररोज राजाला गणिताचे विविध सूत्र शिकवायला सुरुवात केली. पण राजाला मात्र गणित शिकण्यात अजिबात आनंद येत नव्हता. त्याचे लक्ष सारखे इकडे-तिकडे भरकटत असे.
राजाने विचार केला, “सर्वजण म्हणतात की यूक्लिड महान गणितज्ञ आहेत. पण मग ते मला सोप्या पद्धतीने गणित का शिकवू शकत नाहीत? मी त्यांना याबाबत विचारले पाहिजे.”
दुसऱ्या दिवशी, जेव्हा यूक्लिड राजाला गणिताची काही सूत्रे समजावत होते, तेव्हा राजाने वैतागून विचारले,
“गुरुजी, तुम्ही तर महान विद्वान आहात! मग तुम्ही मला अशी सोपी सूत्रे का शिकवत नाही, जी मला सहज समजतील? आत्तापर्यंत मला गणिताचा एक शब्दसुद्धा व्यवस्थित कळलेला नाही. मग मी गणितात कसा पारंगत होणार?”
हे देखील वाचा: गोष्ट क्रमांक 12 : करमचा रोबोट तयार झाला पण… (विज्ञान कथा) Robot is made but…
राजाचे बोलणे ऐकून यूक्लिड हसले आणि शांतपणे उत्तर दिले,
“राजन, मी तुम्हाला अगदी सोपी आणि सहज समजणारी सूत्रे शिकवत आहे. अडचण माझ्या शिकवण्याच्या पद्धतीत नाही, तर तुमच्या शिकण्याच्या इच्छेत आहे.
तुम्ही गणित शिकण्याचा निर्णय घेतला, पण मनाने तुम्ही त्यासाठी तयारच नाही. गणित असो किंवा कोणताही अन्य विषय, अगदी राज्यकारभारसुद्धा – जर तुम्हाला त्या कामात रुची नसेल, ती गोष्ट मन लावून आणि एकाग्रतेने शिकली नाही, तर ती नेहमी कठीणच वाटेल.
तुम्ही ज्या सहजतेने तुमचा राजकारभार चालवता, त्याच सहजतेने गणित शिकायला लागाल, तर नक्कीच यशस्वी व्हाल!”
यूक्लिड यांचे हे शब्द ऐकून राजाला सत्य कळले. त्यांनी गंभीरपणे आणि एकाग्रतेने गणित शिकण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन राजा टॉलमी यांची गणना गणिताच्या महान विद्वानांमध्ये होऊ लागली.
बोध: कोणतेही कार्य यशस्वीपणे साध्य करण्यासाठी मेहनत, जिद्द आणि एकाग्रता अत्यावश्यक असते.